जयपूर: बॉलिवूड अभिनेत्री कतरिता कैफ आणि अभिनेता विकी कौशल आज लग्नबंधनात अडकणार आहेत. सवाई माधोपूरमधील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये कतरिना-विकी लग्नाच्या बेडीत अडकतील. दोघांच्या शाही विवाहाची, त्यांच्या कपड्यांची, डेकोरेशन, आमंत्रण पत्रिकेची जोरदार चर्चा आहे. इतक्या शाही लग्न सोहळ्याचा खर्च कोण करतंय असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
कतरिना आणि विकीशी संबंधित निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार, विकीसोबतच्या विवाहाचा ७५ टक्के खर्च कतरिना करत आहे. लग्न सोहळ्यात होणाऱ्या खर्चाच्या बहुतांश धनादेशांवर कतरिनाची स्वाक्षरी आहे. प्रवास, पाहुणचार, सुरक्षा व्यवस्था आणि अन्य मोठे खर्च कतरिनाच करत आहे.
लग्न सोहळ्याचा उर्वरित २५ टक्के खर्च विकी कौशल करत आहे. लग्नाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय कतरिनाच घेत आहे. लग्न सोहळ्यात माध्यमांना बंदी आहे. सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. पाहुण्यांना त्यांचे फोन रुममध्येच ठेवावे लागणार आहेत. लग्न सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ काढले जाऊ नयेत यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णयदेखील कतरिनाचाच आहे.
काही वृत्तांनुसार, लग्न सोहळ्यात माध्यमांना प्रवेश न देण्याचा कतरिनाचा निर्णय विकीला फारसा पटलेला नाही. त्याला लग्नाचं ठिकाणदेखील फारसं रुचलेलं नाही. मात्र कतरिनाच्या आनंदासाठी त्यानं तिचा निर्णय मान्य केला आहे.