भारत या सलमान खान आणि कतरिना कैफच्या चित्रपटाची वाट प्रेक्षक अनेक दिवसांपासून पाहत आहेत. या चित्रपटाचा पहिला लुक समोर आल्यापासूनच या चित्रपटाची उत्सुकता सगळयांना लागली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना कधी पाहायला मिळणार याविषयी गेल्या कित्येक दिवसांपासून तर्क वितर्क लावले जात आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार याविषयी स्वतः कतरिना कैफने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.
कतरिना कैफने इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवर या चित्रपटातील एक फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, ट्रेलरला केवळ १० दिवस बाकी आहेत. कतरिनाने केलेल्या पोस्टनुसार २४ एप्रिलला भारतचा ट्रेलर लाँच होणार आहे. कतरिनाने ही पोस्ट केल्यानंतर आम्ही आतुरतेने ट्रेलरची वाट पाहत आहोत. भारत चित्रपटासाठी आम्ही उत्सुक आहोत असे अनेकांनी प्रतिक्रियांद्वारे सांगीतले आहे. कतरिना कैफची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. केवळ एका तासात या पोस्टला २ लाखांहुन अधिक लोकांनी लाइक केले आहे.
भारत या चित्रपटाचा दिगदर्शक अली अब्बास जाफर याने गेल्या महिन्यात सोशल मीडियावर पोस्ट करून ट्रेलर बाबत लिहिले होते. भारत या चित्रपटाचा ट्रेलर एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचे त्याने ट्विट केले होते. पण ट्रेलर लाँचची तारीख काय असणार याबाबत त्याने मौन राखणे पसंत केले होते.
'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यावर कतरिना कैफने सलमान खानसोबतचा फोटो इन्स्टाग्राम शेअर केला होता आणि या फोटोला स्पेशल कॅप्शन दिले होते. तिने लिहिले होते की, 'भारत'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. माझ्यासाठी हे खूप इंटरेस्टिंग भूमिका होती. चित्रपट बनण्याची पूर्ण प्रोसेस खूप प्रेरणादायी होती. यासोबतच अली अब्बास जफर, सलमान खान व अतुल अग्निहोत्री बेस्ट बॉइज व अलवीरा खान बेस्ट गर्ल असे लिहित आभारही मानले होते.
'भारत' चित्रपटासाठी कतरिना कैफ पहिली पसंती नव्हती तर तिच्या जागी प्रियांका चोप्राला घेण्यात आले होते. मात्र प्रियांकाने चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर तिच्या जागी कतरिनाची वर्णी लागली. ईदच्या मुहूर्तावर 'भारत' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड ऑडियन्सपर्यंत मर्यादित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.
'भारत’ हा चित्रपट कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़. यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़ म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़ सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात अशी या चित्रपटाची कथा आहे.