कवी कुमार आझाद यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण त्यांची शरीरयष्ठी पाहता त्यांना या क्षेत्रात काम मिळणे शक्य नसल्याचे सगळयांना वाटत होते. पण काहीही झाले तरी आपण अभिनेताच बनायचे असे त्यांनी लहानपणीच ठरवले होते. ते मूळचे बिहार मधील सासाराम मधील गॊरक्षणी गावाचे होते. त्या गावात एकदा एका कामासाठी अभिनेत्री टूनटून आल्या होत्या. त्यांनी कवी आझाद कुमार यांना पाहून ते प्रसिद्ध अभिनेते होणार असे भाकीत त्यावेळीच केले होते. त्यांची ही गोष्ट अनेक वर्षानंतर खरी ठरली.
टूनटून यांचे हे शब्द ऐकून कवी कुमार आझाद यांना चांगलाच हुरुप आला आणि ते अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी दिल्लीला गेले. त्यानंतर ते अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला आले. मुंबईत आल्यावर त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. त्यांनी अभिनय क्षेत्रात येऊ नये असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. त्याच काळात त्यांच्या वडिलांना व्यवसायात खूप नुकसान झाले होते. त्यामुळे त्यांची घरची परिस्थिती अतिशय बेताची होती. मुंबईत आल्यावर तर कवी कुमार आझाद यांच्याकडे एक रुपया देखील नव्हता. त्यांना अनेक दिवस रस्त्यावर राहावे लागले होते. अनेक महिन्यानंतर त्यांना मेला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी त्यानंतर फंटूश या चित्रपटात देखील काम केले.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत निर्मल सोनी डॉ. हाथ ची भूमिका साकारत होते. पण त्यांनी ही मालिका सोडल्यामुळे २००८ मध्ये कवी कुमार आझाद यांना या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. या मालिकेने त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांची आज तब्येत बरी नसल्याने ते चित्रीकरणासाठी येऊ शकणार नाहीत असा त्यांनी सकाळी निरोप कळवला होता. त्यांना सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होते. घरातच त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे त्यांचे निधन झाले.