पहिल्या प्रेमाची बातच न्यारी... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या ‘काय झालं कळंना’ या हळव्या प्रेमकथेने आणि त्यातील कलाकारांच्या अदाकारीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेमाचा अर्थ चुकीच्या मार्गाने सांगण्याचा प्रयत्न काहीवेळा करण्यात येतो, या पार्श्वभूमीवर एक वेगळा दृष्टीकोन हा चित्रपट मांडतो. नव्या पिढीला प्रेमाचा हा सकारात्मक दृष्टीकोन दाखवणं आवश्यक होत अशा भावना प्रेक्षकांकडून व्यक्त केल्या जातायेत.
प्रेम एक-दुस-याचे आयुष्य आनंददायी करणारे असले पाहिजे हा संदेश देणारा हा चित्रपट तरुणाईसोबत मोठयांसुद्धा भावतोय. महाराष्ट्रभरातल्या चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाची श्रवणीय गाण्यांनीसुद्धा प्रेक्षकांच्या मनात घर केलं असून ‘काय झालं कळंना’ या टायटल साँगला प्रेक्षकांकडून सर्वाधिक पसंती मिळतेय.
गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे या नव्या जोडीसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर,सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या भूमिका आहेत.‘श्री धनलक्ष्मी प्रोडक्शन’ ची प्रस्तुती असलेल्या ‘काय झालं कळंना’ या चित्रपटाचे निर्माते पंकज गुप्ता असून दिग्दर्शन व कथा सुचिता शब्बीर यांची आहे. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांच आहे.
प्रेमाची नवी व्याख्या मांडणारा हा सिनेमा प्रेमासोबतच आपली कर्तव्यही प्रत्येकाने पार पाडायला हवीत असा मोलाचा संदेश देतो. केवळ प्रेयेसी किंवा प्रियकरावर प्रेम करायला न शिकवता त्यासोबतच ज्यांनी आपलं पालणपोषण केलं त्यांच्या प्रेमाचंही भान राखायला, मान राखायला हवा असंही ‘काय झालं कळंना’ हा सिनेमा सांगतो. किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी ‘काय झालं कळंना’ची पटकथा लिहिली आहे.