दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) हे सध्या बिग बॉसमुळे (Bigg Boss Marathi Season 5) चर्चेत आहे. ते कलर्स चॅनल प्रोग्रॅमिंग हेड आहेत. बिग बॉस या गेमचे ते स्वत: चाहते आहेत. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत बिग बॉसविषयी अनेक खुलासे केले. स्पर्धकांची निवड, रितेशची होस्ट म्हणून निवड ते बिग बॉस स्क्रीप्टेड आहे का या सगळ्यावर ते स्पष्ट बोलले.
अमोल परचुरे यांच्या 'कॅचअप' चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदेंनी एक खुलासा केला. पहिल्या सिझनवेळी त्यांनाच स्पर्धक म्हणून ऑफर आली होती. ते म्हणाले, "मी प्रत्येक स्पर्धकाला आधी भेटलो. तेव्हा मी त्यांना खेळाबद्दल बोललोच नाही. मी त्यांना बिग बॉसबद्दल एक शब्दही बोललो नाही. काय आवडतं, घरी कसं असतं, काय करता तुम्ही अशा गप्पा मारल्या. यातली गंमत अशी की पहिल्या सीझनला मलाच स्पर्धक म्हणून विचारणा झाली होती. आज मी जेव्हा स्पर्धकांना भेटत होतो तेव्हा मला वाटलं की जी माझी मानसिकता असेल सहभागी व्हायचं की नाही तीच त्यांची असेल. पण तो पुढचा भाग आहे. आधी मला त्या माणसाबद्दल जाणून घ्यायचं होतं."
"हे सगळं स्क्रीप्टेड आहे हे फार थोतांड कल्पना आहे. मी तिथे काम करतोय मला माहित आहे की ते लोक काय करतात आणि नंतर ते सगळं एडिड करुन ते सादर होतं ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आहे. कोणीही आतमध्ये जाऊ शकत नाही, कोणीही संपर्क करु शकत नाही. घरात १०० कॅमेरे आहेत जे २४ तास सुरु असतात. यातून कोणतीच गोष्ट सुटणार नाही. त्यामुळे हे स्क्रीप्टेड नाही."