Join us

केदारचे नवीन नाटक ‘तू तू मी मी’

By admin | Published: September 16, 2015 2:59 AM

उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य याबरोबरच उत्तम कलाकार, विनोदाचा दर्जा या वैशिष्ट्यांमुळे केदार शिंदे यांची नाटके म्हणजे रसिकांसाठी जणू निखळ मनोरंजनाची पर्वणीच!

उत्कृष्ट दिग्दर्शन, लेखन, नेपथ्य याबरोबरच उत्तम कलाकार, विनोदाचा दर्जा या वैशिष्ट्यांमुळे केदार शिंदे यांची नाटके म्हणजे रसिकांसाठी जणू निखळ मनोरंजनाची पर्वणीच! म्हणूनच ते नवीन काय देणार, याची प्रतीक्षा आणि उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. पण आता रसिकांना यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नसून, ‘सही रे सही’ आणि ‘पुन्हा सही रे सही’च्या यशस्वी दिग्दर्शनानंतर त्यांच्याच लेखणीतून उतरलेले ‘तू तू मी मी’ नाटक येत्या ३१ आॅक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. जुनीच वस्तू नवीन रॅपलमध्ये देण्याचा प्रयत्न या नाटकातून होणार असला तरी त्याला खास नव्या ढंगाचा ‘केदारकी’ टच असणार आहे, हेही तितकेच खरे! या नाटकाविषयी केदार शिंदे सांगतात, ‘पूर्वी १९९९मध्ये ‘तू तू मी मी’ हे नाटक रंगभूमीवर आले होते; त्या वेळी भरत जाधव, अंकुश चौधरी आणि विजय चव्हाण या ‘त्रिकूटाने’ रंगभूमीवर धमाल उडवून दिली होती. इतक्या वर्षांनंतर पुन्हा नव्या संचात आणि नवीन कलाकारांसमवेत हे नाटक मी बसवत आहे. नवरा-बायकोची गंमत या नाटकात अनुभवायला मिळणार आहे. त्यांच्यातील वादविवाद विकोपाला गेल्यानंतर हसतखेळत त्यावर कसे सोल्युशन काढले जाते, याची ती कहाणी आहे. काही विषय हे कालातीत असतात़ त्यामध्ये नवरा-बायकोचे भांडण याचाही समावेश होतो. मान्य आहे की, आत्ताच्या काळातील भांडणांचे विषय वेगळे आहेत़ कारण त्या वेळी मोबाइल, सोशल नेटवर्किंग साईटचे प्रस्थ नव्हते. पण वाद-विवाद हे होतच आहेत. अनेक वर्षांपासून मित्र असलेला संतोष पवार, कमलाकर सातपुते आणि संजय थापरे यांची झकास कॉमेडी यात पाहायला मिळणार आहे. अभिनेत्रींची निवड अजून करायची आहे. भरत आणि केदार हे रंगभूमीवरचे एक समीकरण झाले आहे. १५ वर्षांपूर्वी भरतने या नाटकात भूमिकादेखील केली होती़ तरीही वेगळे कलाकार घेण्यामागे प्रयोजन काय? असे विचारले असता भरत माझी आधीच तीन नाटके करीत आहे, त्या नाटकांना त्याला वेळ द्यावा लागतो. याचा विचार करूनच दुसऱ्या कलाकारांना संधी देण्याचे ठरविले असल्याचे केदार शिंदे यांनी स्पष्ट केले.