बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यावरून सध्या वाद सुरू आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही त्याच्या समर्थनार्थ बोलत आहेत, तर काही याला तीव्र विरोध करत आहेत. दरम्यान, आता कंगना राणौतनेही यावर आपले मत व्यक्त केले आहे. सुप्रीम कोर्टात समलैंगिक विवाहाबाबत सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान तिने लिंग आणि सेक्शुअल प्रेफरन्स यासंदर्भात भाष्य केले आहे.
कंगना राणौतने समलैंगिक विवाहाबाबत ट्वीट केले आहे. कंगनाचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कंगनाने ट्वीटमध्ये म्हटले आहे, तुम्ही कोणीही असाल, तुम्ही पुरुष/स्त्री/इतर काहीही असा, तुमचे जेंडर काय आहे, याने काही फरक पडत नाही. या जमान्यात आपण अभिनेत्री, दिग्दर्शिका असे शब्द वापरत नाही. त्यांना आपण अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणतो. तुम्ही या जगात काय करत आहात हीच तुमची ओळख आहे, तुम्ही बेडरूममध्ये काय करता याने तुमची ओळख बनत नाही. तुमची लैंगिक पसंती काहीही असली तरी ती तुमच्या बेडरूमपर्यंत राहिली पाहिजे. त्यांना तुमचे ओळखपत्र बनवून ते सर्वत्र दाखवू नका. तुमचे जेंडर ही तुमची ओळख नसल्याचे कंगनाने म्हटले आहे.
ती स्वतः ग्रामीण भागातील एक स्त्री आहे, जीवनाने तिला कोणतीही सवलत दिली नाही, तिला अभिनेते, चित्रपट निर्माते, निर्माते आणि लेखकांच्या जगात आपले स्थान निर्माण करायचे होते. कंगनाने लागोपाठ तीन ट्वीट केले आहेत. ज्यामध्ये कंगनाने स्वतःला फक्त महिला समजणाऱ्यांना, त्यांनी अशी चूक करू नये, असा सल्ला दिला आहे.
यासोबतच कंगनाने आणखी एक ट्वीट केले आहे. यात आपला मुद्दा पुढे नेत तिने लिहिले की, कधीही एखाद्याला लिंग किंवा इतर कोणत्याही शारीरिक वैशिष्ट्यांच्या दृष्टिकोनातून पाहू नका. तुम्हाला माहिती आहे त्या लोकांचे काय झाले? ज्यांना वाटते की, कंगना फक्त एक स्त्री आहे. त्यांना खूप धक्का बसला, कारण मी अशी व्यक्ती नाही जी स्वत:ला किंवा इतरांना या नजरेने बघेन. तुम्ही लोक एवढा वेळ कुणाच्या शारीरिकतेवर का घालवता? माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या बाबतीत असे घडले तर तुम्ही फार पुढे जाणार नाही. लिंगाच्या विचारांपासून मुक्त व्हा. जसे आहात तसे उठा आणि चमका. शुभेच्छा.