मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट ( Ketaki Chitale - Sharad Pawar controversy) करणारी केतकी तब्बल 41 दिवस जेलमध्ये होती. सध्या ती जामीनावर आहे. पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याप्रकरणी केतकीला अटक करण्यात आली होती. या अटकेदरम्यान केतकीवर शाईफेक करण्यात आली होती. याचे एक ना अनेक फोटो व्हायरल झाले होते. शाईफेकीमुळे तिची साडी, ब्लाऊज खराब झालं झालं होतं. ब्लाऊजवर शाईचे डाग राहिले होते. पण आता केतकीने याच ब्लाऊजचं रूपडं बदलवून टाकलं आहे. होय, शाईच्या डागांनी खराब झालेल्या ब्लाऊजवर तिने सुंदर डिझाईन तयार केलं. याचा व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
व्हिडीओच्या सुरूवातीला शाईफेक घटनेचे काही फोटो दिसतात. त्यानंतर केतकी शाईमुळे खराब झालेलं ब्लाऊज दाखवते आणि यानंतर शाईचे डाग असलेल्या ठिकाणी ती रंग भरताना दिसते. या ब्लाऊजवर ती त्रिशूळचं सुंदर डिझाईन बनवते. ‘हर हर महादेव’ असं म्हणत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. तुझ्या हिंमतीला दाद द्यावी तितकी कमीच, असं एका युजरने लिहिलं आहे. तुझी कलाकुसर पाहून थक्क झालो. शिवा तुला अधिक बळ देवो, असं एका युजरने लिहिलं आहे.
केतकी चितळे हिने जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती.‘एखादी पोस्ट कॉपी पेस्ट करून फेसबुकवर शेअर केल्यानंतर इतका मोठा गुन्हा होतो का की तुम्ही थेट तुरुंगात टाकता, ४१ दिवस तुम्ही त्या व्यक्तीपासून काढून घेता? मी काही चुकीचं केलं नाही, हे मला माहित आहे. त्यामुळे मी या गोष्टीचा सामना करू शकले,’ असं ती म्हणाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांकडून आणि जमावाकडून मारहाण झाल्याचा आरोपही केतकीने या मुलाखतीत केला होता. ‘माझ्या कानाखाली मारण्यात आलं, डोक्यात कुणीतरी जोरात टपली मारली आणि राइट ब्रेस्टवर पंच मारला. मी साडी नेसली होते. कुणीतरी धक्का दिला, पायात पाय घातल्यामुळे मी पोलिसांच्या गाडीत पडले. साडी देखील खेचण्यात आली. माझा पदर पडला होता, साडी वर गेली होती, माझा विनयभंग झाला.... इतके होऊनही अंगावर केमिकल रंग आणि अंडीदेखील फेकण्यात आली,’ असा आरोप तिने केला होता.