Join us

साऊथ चित्रपटांची खूप खिल्ली उडवली गेली, पण आता...; वाचा, ‘KGF’ सुपरस्टार यश काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 11:42 AM

Yash on Success of South Indian Movies: साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. बॉलिवूडच्या तुलनेत साऊथचे सिनेमे छप्परफाड कमाई करत आहेत. अर्थात काही वर्षांआधी हे चित्र नव्हतं...

Yash on Success of South Indian Movies: केजीएफ’ (KGF) आणि ‘केजीएफ 2’ (KGF 2) या चित्रपटानंतर साऊथ स्टार यश (Yash ) चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. केवळ साऊथमध्येच नाही तर जगभरात त्याचे चाहते आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतही बराच मोठा चाहतावर्ग आहे. तशीही सध्या साऊथ स्टार्स आणि साऊथ सिनेमांचीच चलती आहे. साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला अक्षरश: घाम फोडला आहे. बॉलिवूडच्या तुलनेत साऊथचे सिनेमे छप्परफाड कमाई करत आहेत. अर्थात काही वर्षांआधी हे चित्र नव्हतं. लोक साऊथ चित्रपटांची, साऊथ कलाकारांची खिल्ली उडवायचे. त्यांना ट्रोल करायचे. पण आता चित्र बदललं आहे. आता हेच लोक साऊथ कलाकारांना डोक्यावर घेत आहेत. ‘केजीएफ’ सुपरस्टार यश नेमक्या याच गोष्टीवर बोलला.

काय म्हणाला यश‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना यश म्हणाला,‘ काही वर्षांपूर्वी आमच्या साऊथ चित्रपटांची खिल्ली उडवली जायची, उत्तरेकडचे लोक आमच्यावर हसायचे. ही काय अ‍ॅक्शन आहे? लोक उडत आहेत असं म्हणत आमची खिल्ली उडवायचे. माझ पण आता हेच लोक आमच्या प्रेमात पडले आहेत. लोकांना आमचा आर्ट फॉर्म कळू लागला आहे. सुरूवातीला आमच्या चित्रपटाची अडचण ही होती की, ते अतिशय कमी किमतीत विकले जात. वाईट पद्धतीने त्याचं डबिंग व्हायचं आणि मग काहीतरी चित्रविचित्र नावांनी ते प्रदर्शित व्हायचे. पण आता लोकांना साऊथ सिनेमे आवडू लागले आहेत आणि याचं संपूर्ण श्रेय एस.एस. राजमौलींना जातं. त्यांचा ‘बाहुबली’ प्रदर्शित झाल्यानंतर सगळं चित्र पलटलं. राजमौली यांच्यामुळेच हा एवढा मोठा बदल घडून आला आहे. आता लोक आमच्या चित्रपटांशी जोडले जात आहेत. जर तुम्हाला डोंगर फोडायचा असेल तर त्यासाठी सातत्याने काम करावं लागेल. ‘बाहुबली’ने ते काम इथे केलं. ‘केजीएफ’ एक विशिष्ट हेतू समोर ठेवून बनवण्यात आला होता. लोकांना प्रेरणा देण्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला होता. आता कुठे लोकांनी दाक्षिणात्य चित्रपटांना नोटीस करायला सुरुवात केली आहे आणि याचा मला आनंद आहे.

 मला लोक रेम्बो सर, ग्रेट लायन्स म्हणायचे...लोक आमच्या चित्रपटांवर हसायचे. मी सुद्धा हे भोगलं आहे. लोक मला रेम्बो सर, ग्रेट लायन म्हणायचे. हे असं का म्हणतात, मी विचारात पडायचो. मग माझ्या लक्षात आलं की, माझ्या जुन्या चित्रपटांना डब केल्या गेलं होतं..., असंही यश म्हणाला. यशच्या ‘केजीएफ’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याचा ‘केजीएफ चॅप्टर 2’ हा चित्रपट 2022 मधील सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. या चित्रपटाने जगभरात 1207 कोटी  कमाई केली आहे. 2022मध्ये आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई केलेल्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत केवळ 4 बॉलिवूड आहेत आणि तर इतर सर्व साऊथ सिनेमे  आहेत.  

टॅग्स :केजीएफयशTollywood