छोट्या पडद्यावरील 'खतरों के खिलाडी' या रियालिटी शोची रसिकांना उत्सुकता असते. सुरूवातीला खिलाडी अक्षय कुमार आणि त्यानंतर बॉलीवूडचा दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालक असलेला हा रियालिटी शो रसिकांमध्ये लोकप्रिय ठरला आहे. लवकरच या रियालिटी शोचं दहावं पर्व रसिकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या पर्वात कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची उत्कंठा रसिकांना लागली आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची संभावित नावं समोर आली आहे.
अमृता खानविलकर
यंदाच्या पर्वात सहभागी होणारं मराठमोळं नाव म्हणजे अमृता खानविलकर. वाजले की बारा म्हणत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवणारी ही अभिनेत्री आता काळजाचे ठोके चुकवणारे स्टंट करताना दिसणार आहे. मराठी चित्रपट, मालिका, नाटक, रियालिटी शोसह अमृतानं हिंदी चित्रपटातही आपली जादू दाखवली आहे.
कोरिओग्राफर धर्मेशसुद्धा
डान्सर आणि कोरिओग्राफर धर्मेशसुद्धा 'खतरों के खिलाडी 10' मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. धर्मेशनं याआधी एबीसीडी, एबीसीडी-२ आणि 'बँजो' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. शिवाय काही डान्स रियालिटी शोमध्ये तो मेन्टॉर आणि जजच्या भूमिकेतही पाहायला मिळाला.
आरजे मलिष्का
सर्वांची लाडकी आरजे मलिष्कासुद्धा 'खतरों के खिलाडी 10'मध्ये सहभागी होणार आहे. आपल्या हटके व्हीजे अंदाजामुळे मलिष्का रसिकांची लाडकी बनली आहे. मलिष्का अनेकदा तिच्या रॅप साँगमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री अदा खान
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदा खान खतरों के खिलाडी १० मध्ये सहभागी होऊ शकते. अदाला तिच्या 'नागिन' या मालिकेनंतर जास्त लोकप्रियता मिळाली. सध्या ती 'सितारा : विष या अमृत' या मालिकेत काम करत आहे.
अभिनेत्री करिश्मा तन्ना
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री करिश्मा तन्नासुद्धा 'खतरों के खिलाडी १० मध्ये दिसण्याची शक्यता आहे. करिश्मानं 'नागिन 3' मध्ये काम केलं होतं.'ये है मोहब्बतें' फेम करण पटेल हा खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेणार आहे. करणनं काही दिवसांपूर्वीच तो या शोमध्य सहाभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं.
अभिनेत्री तेजस्विनी प्रकाश
'पेहरेदार पिया की' वादग्रस्त मलिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री तेजस्विनी प्रकाशसुद्धा 'खतरों के खिलाडी १०'ची स्पर्धक असणार आहे. नुकतीच तेजस्विनी 'सिलसिला बदलते रिश्तों का २' या मालिकेत झळकली होती.
कॉमेडियन बलराज सयाल
प्रसिद्ध इंडियन कॉमेडियन बलराज सयाल हाही 'खतरों के खिलाडी १०'मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत.
अभिनेता शिवीन नारंग
छोट्या पडद्यावरील मालिका 'वीर की अरदास वीरा' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता शिवीन नारंग सुद्धा 'खतरों के खिलाडी १०'चा स्पर्धक असणार आहे.
अभिनेत्री राणी चटर्जीसुद्धा
भोजपुरी अभिनेत्री राणी चटर्जीसुद्धा 'खतरों के खिलाडी' या पर्वात सहभागी होणार आहे. ती 'ससुरा बडा पैसेवाला' या तिच्या चित्रपटासाठी ओळखली जाते.