कलाकार : विद्युत जामवाल, शिवालिका ऑबेरॉय, दिब्येंदू भट्टाचार्य, शिबा चढ्ढा, राजेश तेलंग, रुखसार रेहमान, दानिश हुसेन, अश्वथ भट, रिद्धी शर्मालेखक - दिग्दर्शक : फारुख कबीरनिर्माता : कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, स्नेहा पारेख, राम मिरचंदानीशैली : अॅक्शन-थ्रिलरकालावधी : २ तास २६ मिनिटेस्टार - साडे तीनचित्रपट परीक्षण - संजय घावरे
रामराज्यात केवळ एकाच सीतामातेनं अग्निपरीक्षा दिली होती, पण आज कलियुगात असंख्य सीतांना नेहमीच अग्निपरीक्षांना सामोरं जावं लागत आहे. जेव्हा कधी एखाद्या अंधाऱ्या कोनाड्यात अबलेवर किंवा अल्पवयीन मुलीवर अन्याय होतो, तेव्हा 'आज हम फिर एक बार हार गए...' असं या चित्रपटातील वाक्य तंतोतंत खरं ठरतं. कठोर कायदे-शिक्षा करून आजही मुलींवरील अत्याचाराला आळा बसलेला नाही. एखाद्या चिमुरडीवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हा प्रत्येकाचं रक्त खवळतं पण सर्वसामान्य माणूस काहीच करू शकत नाही हेच आजच्या समाजाचं विदारक चित्र आहे. दिग्दर्शक फारुख कबीर यांच्या चित्रपटातील सर्वसामान्य नायक मात्र गप्प बसत नाही. कायदा जेव्हा गुन्हेगारांच्या दिमतीला उभा रहातो, तेव्हा नायक स्वत:च अन्यायाचा सूड घेतो.
कथानक : मागच्या भागात संपलेली समीर आणि नर्गिस चौधरी या जोडप्याची कथा या भागात पुढे सुरू होते. अन्याय झाल्यानंतर भारतात परतलेल्या नर्गिसला समाजाच्या नजरांच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागत असतं. त्यामुळं दोघांमध्ये दरी निर्माण होते. डिप्रेशनमध्ये गेलेल्या नर्गिसवर उपचार सुरू असतात. अशातच मित्राच्या भावाच्या निधनानंतर अनाथ झालेल्या नंदिनी नावाच्या मुलीला समीर घरी आणतो. नर्गिसला तिचा लळा लागल्यानंतर दोघेही तिला दत्तक घेतात. नंदिनीमुळं नर्गिस हळूहळू डिप्रेशनमधून बाहेर पडत असतानाच एक घटना घडते. शाळेत गेलेल्या नंदिनीला त्याच शाळेतील एका मोठ्या मुलीसह शाळेतीलच काही मुलं पळवून नेतात. त्यानंतर बरंच काही घडतं, जे कधी अंतर्मुख होऊन विचार करायला लावतं, कधी मनाला चटका लावतं, तर कधी चीड निर्माण करतं.
लेखन-दिग्दर्शन : फारुख यांनी समाजातील ज्वलंत मुद्द्यावर पटकथा लिहीली आहे. धडाकेबाज अॅक्शनची फोडणी देत थोडाफार मनोरंजक मसालाही अॅड करण्यात आला आहे. चित्रपटाची सुरुवात काहीशी संथ झाल्यासारखी वाटते, पण पटकथेचा हुक असलेली घटना घडल्यावर उत्सुकता वाढते. प्रत्येक दृश्य बारकाव्यांनिशी सादर केलं आहे. मुलींवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी घालणाऱ्या स्त्रिया जोपर्यंत समाजात आहेत, तोपर्यंत कोणतीही मुलगी सुरक्षित राहू शकत नसल्याचं हा चित्रपट अधोरेखित करतो. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांची महान परंपरा लाभलेल्या या देशातील काही तरुणांना आपल्या संस्कृतीचा विसर पडला आहे. त्यामुळेच जेव्हा एखाद्या अबलेवर अन्याय होतो, तेव्हा केवळ ती अबला हरत नसून देश म्हणून आपण सर्वजण हरतो अशी राजेश तेलंग यांनी पत्रकाराच्या रूपात व्यक्त केलेली भावना खरी आहे. आईस्क्रीमवाल्या वृद्धाचं मदत करणं, मुलींना शोधण्यासाठी धावाधाव करणं, गावकऱ्यांनी मशाली पेटवून मुलींचा शोध घेणं, मुलीची अवस्था पाहून पित्याचं कोलमडणं यांसारखे क्षण भावूक करतात. काही दृश्ये मात्र अनुत्तरीत प्रश्न मागे ठेवतात. तुरुंगात हाणामारी झाल्यावर नायक बऱ्याच कैद्यांची हत्या करतो, तरीही काहीच कारवाई कशी होत नाही? एरव्ही सर्वात शेवटी येणारे पोलीस त्यांच्या अधिकाऱ्याला मारणाऱ्या नायकाला पकडण्यासाठी लगेच कसे येतात? क्लायमॅक्स इजिप्तमध्ये नेण्याची खरंच गरज होती का? असे काही प्रश्न सिनेमा पाहताना पडतात. प्रसंगानुरुप गाणी अर्थपूर्ण आहेत. वातावरणनिर्मिती, अॅक्शन सीन्स, कॅमेरावर्क आणि संकलन खूप सुरेख आहे.
अभिनय : एकाच चित्रपटात विद्युत जामवालची दोन भिन्न रूपं पहायला मिळतात. मध्यांतरापूर्वीपर्यंत तो सर्वसामान्य आहे, पण नंतर अॅक्शनपॅक्ड रूप धारण करतो. शिवालिका ऑबेरॅायनं डिप्रेशनमध्ये जाऊनही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी पतीला प्रोत्साहित करणाऱ्या पत्नीची भूमिका चांगली साकारली आहे. शिबा चढ्ढा यांनी खलनायकी रंग उधळताना बोलीभाषेला दिलेलं महत्त्व लक्षात राहतं. राजेश तेलंग यांनी पत्रकाराच्या भूमिकेत संवेदनशील पत्रकारीतेचं दर्शन घडवलं आहे. दिब्येंदू भट्टाचार्यनं साकारलेली कसायाची भूमिका थरकाप उडवते. रुखसारनं छोट्याशा भूमिकेतही चांगलं काम केलं आहे.
सकारात्मक बाजू : सुरुवातीपासून अखेरपर्यंत चित्रपट आपल्या मूळ मुद्द्यापासून दूर जात नाही. त्यामुळं पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता वाढते.
नकारात्मक बाजू : अॅक्शनच्या माध्यमातून मसाल्यांचा वापर करण्याचा मोह टाळता आला असता तर चित्रपट आणखी वेगळ्या उंचीवर पोहोचला असता.
थोडक्यात : ज्वलंत मुद्द्यावर आधरलेला दुसरा भाग पहिल्या भागाच्या तुलनेत जास्त प्रभावशाली वाटतो. मुलांवर चांगले संस्कार केले, त्यांना योग्य शिकवण दिली तर मुलीही बिनधास्तपणे समाजात वावरू शकतील. काय करायला हवं आणि काय नको हे जाणण्यासाठी हा चित्रपट पहायला हवा.