Join us

सत्य घटनेने प्रेरीत असलेला 'खुदा हाफिज' - फारुख कबीर

By तेजल गावडे | Published: August 07, 2020 7:00 AM

विद्युत जामवाल अभिनीत अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'खुदा हाफिज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक फारुख कबीर यांच्याशी केलेली ही बातचीत...

विद्युत जामवाल अभिनीत अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट 'खुदा हाफिज' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यानिमित्ताने दिग्दर्शक फारुख कबीर यांच्याशी केलेली ही बातचीत...

-  तेजल गावडे

: 'खुदा हाफिज' चित्रपट थिएटर ऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होतो आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटते ?

- कोरोनाच्या संकटात देखील डिस्नी प्लस हॉटस्टारवर माझा चित्रपट खुदा हाफिज प्रदर्शित होत आहे, त्यासाठी स्वतःला मी नशीबवान समजतो. दिग्दर्शक, कलाकार व संपूर्ण टीमला आपला चित्रपट जास्तीत जास्त लोकांनी पहावा अशी अपेक्षा असते. अशा परिस्थितीत यापेक्षा चांगलं प्लॅटफॉर्म कोणतंच असू शकत नाही. मी खूप खूश आहे की लोकांना हा चित्रपट पहायला मिळेल. आता चित्रपट प्रदर्शित नसता झाला तरी मला त्याची खंत वाटली नसती कारण सध्याच्या घडीला सर्वांनी सुरक्षित राहणे गरजेचे आहे. 

: या चित्रपटाच्या निमित्ताने तुमचे नाव मोठ्या बॅनरसोबत जोडले गेले आहे, याबद्दल काय सांगाल? 

- काही वर्षांपूर्वी माझी पहिली 'द अवेकिंग' शॉर्टफिल्म प्रदर्शित झाली होती. त्यावेळी मला पहिला ब्रेक कुमार मंगत यांनीच दिला होता. ही शॉर्टफिल्म मी अजय देवगणसोबत बनवली होती. कुमार मंगत यांच्यासोबत मी आधीपासून काम केलेले आहे. माझ्या करियरसाठी पॅनोरमा स्टुडिओज मला खूप महत्त्वाचे वाटते. कुमार मंगत व अभिषेक पाठक यांच्यासोबत माझे खूप चांगले नाते आहे. कुमार मंगत असे निर्माते आहेत जे दिग्दर्शकाला काम करण्यासाठी पूर्ण मोकळीक देतात आणि प्रोत्साहनही. त्यामुळे मी पॅनोरमा स्टुडिओजसोबत जोडल्यामुळे खूप आनंदी आहे. मला आशा आहे की कुमार मंगत यांच्यासोबत मी आणखीन काही प्रोजेक्टसाठी काम करेन. त्यांनी ओमकारा, दृश्यम यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि त्यात आता खुदा हाफिजचेदेखील नाव जोडले गेले आहे, त्यामुळे मी खूप खूश आहे.

: चित्रपटाबद्दल थोडक्यात सांगा?

- खुदा हाफिज चित्रपट एका सत्य घटनेवर आधारीत आहे. काही वर्षांपूर्वी मी वर्तमानपत्रात एक आर्टिकल वाचले होते. ज्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला होता. ती घटना माझ्या डोक्यातून जात नव्हती. त्याचवेळी मी त्या आर्टीकलचे कात्रण माझ्याजवळ ठेवले आणि या घटनेवर स्टोरी लिहायचे ठरविले. त्यासाठी मी काही पत्रकारांशी बोललो. तसेच अशा लोकांना भेटलो जे अशाच घटनांमुळे प्रभावित झाले होते. मग मी कथा लिहिली. 

: चित्रपटात कलाकारांची निवड कशी केली?

- मला नेहमी चॅलेजिंग गोष्टी करायला आवडतात. कलाकारांनी यापूर्वी अशा प्रकारची भूमिका केली नसेल, अशा कलाकारांची निवड इतर पात्रांसाठी केली.  विद्युत जामवालला चित्रपटाची कथा सांगितल्यावर त्याला ती भावली. त्यानंतर मग आम्ही त्यावर बातचीत करायला सुरूवात केली की पात्राला कसे दाखवले पाहिजे. त्याच्या भूमिकेला वेगवेगळे पैलू आहेत. त्याच्या भूमिकेवर जवळपास आम्ही तीन महिने काम केले.  विद्युतने यापूर्वी जास्त अ‍ॅक्शन सिनेमात काम केले आहे. यात तो रिअल पात्र व रिअल अ‍ॅक्शन करताना दिसेल. अन्नू कपूर यांनी जास्त कॉमेडी भूमिका केल्या आहेत. पण या चित्रपटात ते अफगाण पठाण कॅब ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसणार आहेत. अहाना कुमरा आणि शिव पंडितने अ‍रब कमांडोचा रोल केला आहे. दोघांनीही खूप सकारात्मक पात्र सिनेमात साकारले आहे. यासाठी त्याने अरब भाषेचे प्रशिक्षण घ्यावे लागले.या चित्रपटातील कलाकारांना त्यांच्या भूमिकेत थोडे फार आव्हान होते.

: या चित्रपटाचा अनुभव कसा होता ?

- या चित्रपटाचा खूप अप्रतिम अनुभव होता. या चित्रपटाच्या ट्रेलरवर देशातूनच नाही तर अमेरिका, इंडोनेशिया, युके असे जगभरातून लोक खूप चांगली प्रतिक्रिया देत आहेत. माझ्यासाठी ही इंटरेस्टिंग बाब आहे. एखाद्या कलाकाराला त्याच्या कामाची पोचपावती मिळते तेव्हा खूप चांगले वाटते. बरेच चॅलेंजेस होते. त्यातून बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळून आल्या. कुमार मंगत व अभिषेक पाठक पाठिशी खंबीरपणे उभे होते. विद्युत जामवालनेदेखील या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि सहकार्य केले. त्यामुळे मला अभिमान वाटतो. या सर्वांच्या सहकार्यामुळे खुदा हाफिज उत्तमरित्या साकारता आला.  

टॅग्स :विद्युत जामवाल