'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घरातघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने काही महिन्यांपूर्वी राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली होती. तिचा पती आशुतोष भाकरे देखील एक अभिनेता होता. त्याने नैराश्यातून आपले जीवन संपवल्याची माहिती त्यानंतर पुढे आली होती. मयुरी आणि त्याच्या कुटुंबाला याचा खूप मोठा धक्का बसला होता. मयुरी या धक्क्यातून हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आहे.
मयुरी इमली या मालिकेत सध्या काम करत असून तिच्या कामाचे चांगलेच कौतुक होत आहे. मयुरीने तिच्या भविष्याबाबत काय विचार केला आहे हे नुकतेच तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. मयुरी सांगते, मी आजही त्याच्यावर प्रेम करते आणि आजही तो माझ्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे. त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते. तो गेल्यानंतर मी काही मुलं दत्तक घेण्याचा विचार करतेय. मुलांसाठी दुसरं लग्न करण्याची काय आवश्यकता आहे?
मयुरीनी लिहलेलं ‘डिअर आजो’ हे नाटक लवकरच विविध प्लॅटफॉर्मवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होणार आहे. तीन वर्षांपूर्वी मयुरीने हे नाटक लिहिलं होतं. या नाटकात भारतातील आजोबा आणि अमेरिकेत वाढलेली नात यांच्यातील नातेसंबधावर भाष्य करण्यात आलं आहे. लेखक मयुरी देशमुख हिचं हे पहिलंच नाटक असले तरी याचे चांगलेच कौतुक झाले होते.