Join us  

हृतिक-कंगना यांच्याकडून लाजिरवाणे प्रकार

By admin | Published: March 20, 2016 2:13 AM

हृतिक रोशन आणि कंगना यांच्यात चालू असलेला वाद पाहता नात्याची कशी थट्टा केली जाते हे दिसून येते. बॉलीवूडमधील हे नामवंत कलाकार नात्यावरून कायदेशीर लढाई करतील

- संडे स्पेशल : अनुज अलंकारहृतिक रोशन आणि कंगना यांच्यात चालू असलेला वाद पाहता नात्याची कशी थट्टा केली जाते हे दिसून येते. बॉलीवूडमधील हे नामवंत कलाकार नात्यावरून कायदेशीर लढाई करतील, असे कोणालाही वाटले नव्हते. या प्रकरणात जे काही होत आहे, ते लाजिरवाणे आहे.नातेसंबंध हा कोणत्याही व्यक्तीच्या खासगी जीवनात फारच महत्त्वाचा भाग असतो, असे म्हटले जाते. हा भाग प्रायव्हसीलाही जोडला जातो. त्याला कोणत्याही परिस्थितीत वाईट समजले जात नाही. बॉलीवूडमध्ये तर अशा नातेसंबंधावरून नेहमीच लपवाछपवीचा खेळ खेळला जातो.बॉलीवूडमधील मोठे सितारे आपले नातेसंबंध लपविण्याचा खेळ खेळत असतात; पण हृतिक रोशन आणि कंगना यांच्यातील संबंधावरून समोर आलेले नाट्य पाहता, यापूर्वी असे कधीही घडले नव्हते.त्यामुळे कोणालाही दोष देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. येथे कोणत्याही चौकशीचे प्रकरण नाही. त्यामुळे एकाला निर्दोष ठरविणे आणि एकाला दोषी ठरविण्याचा प्रश्नच नाही. दोषीच मानावयाचे ठरल्यास दोघांनीही नात्याच्या नावावर असा तमाशा केला आहे, की जे टाळले जाऊ शकले असते. हृतिक आणि कंगना ही काही लहान मुले नाहीत किंवा किशोरवयीनही नाहीत. त्यामुळे त्यांच्यात केवळ भावनिक संबंध असण्याचे कारण नाही. हृतिक आणि कंगना यांचे यापूर्वी संबंध राहिलेले आहेत. हृतिकने लग्नाला १४ वर्षे झाल्यानंतर सुझनला घटस्फोट दिला. कंगनाचा भूतकाळही सर्वांना माहीत आहे. शेखर सुमनचा मुलगा अध्ययन याच्याशी कंगनाचे असलेले संबंध जगजाहीर आहेत. या स्थितीत हृतिक आणि कंगना परस्परांच्या जवळ आले असतील तर इंडस्ट्रीच्या पद्धतीनुसार ते वावगे नाही. चित्रपटात एकत्र काम करीत असताना कलावंत नेहमीच एकमेकांच्या जवळ येतात आणि नात्यात बांधले जातात. अनेक नातेसंबंध पुढे चालून मजबूत होतात, तर काही नातेसंबंध थोडेफार पुढे जाऊन संपुष्टात येतात. दोघांच्या नात्यात वितुष्ट आले, तर दोघेही एकत्र बसून विषय मिटवतील आणि भविष्य निश्चित करतील.मात्र येथे हृतिक आणि कंगना दोघेही अपरिपक्वपणा दाखवत आहेत. कोणी कोणाला कधी ई-मेल लिहिला, केव्हा लिहिला, कोणी प्रायव्हसीचे उल्लंघन केले? या प्रश्नांची उत्तरे तर या दोघांकडेच असतील; पण दोघेही परस्परांना वकिलामार्फत नोटीस पाठविण्याचा खेळ खेळत आहेत आणि परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. ते पाहता, हे योग्य नाही असेच म्हटले जाऊ शकते. नात्याच्या नावाखाली असा तमाशा होईल, याची दोघांपैकी एकालाही अपेक्षा नव्हती. त्यांच्या अशा वागण्याने लोकांच्या थट्टेचाही ते विषय बनले आहेत.