सध्या अनेक बायोपिक मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येतायत. यामधील अनेक चित्रपट हे सध्या बॉक्स ऑफिसवरही यश मिळवतायत. यातच आता देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या बायोपिकची घोषणा करण्यात आली आहे. किरण बेदी यांचा जीवनप्रवास आता रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे.
किरण बेदी यांच्या बायोपिकला 'बेदी' असं नाव देण्यात आलं आहे. हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होईल. निर्मात्यांनी मोशन पोस्टर रिलीज केले आहे. या सिनेमामध्ये प्रेक्षकांना किरण बेदी यांच्या कधीही न ऐकलेल्या गोष्टींचा समावेश असेल असं निर्मात्यांनी म्हटलं आहे. कुशाल चावला या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. पण, कलाकारांचा खुलासा अद्याप झालेला नाही.
किरण बेदी यांना निडर, प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते. किरण बेदी या त्यांच्या बॅचमधील 80 पुरुष पोलिस अधिकाऱ्यांमध्ये एकमेव महिला आयपीएस अधिकारी होत्या. किरण बेदी यांनी इतरही अनेक सामाजिक कामं केली. हुंडा प्रथेविरुद्ध आवाज उठवला. किरण बेदी या टेनिसपटूही होत्या. किरण बेदी यांनी दिल्लीव्यतिरिक्त गोवा, चंदीगड आणि मिझोराममध्ये आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे.
अमृतसरमध्ये ९ जून १९४९ रोजी जन्मलेल्या किरण बेदी यांनी ड्रग्जच्या विरोधात मोहीम चालवली होती. तिहार तुरुंगाला मॉडेल जेल बनवण्यात त्यांनी योगदान दिले. त्यांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या विरोधात अभियान चालवलं. तुरुंगात कैद्यांच्या धूम्रपानावर बंदी घातली. 35 वर्षे देशाची सेवा केल्यानंतर 2007 मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली. त्यावेळी त्या ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या महासंचालकपदावर होत्या.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर किरण बेदी यांनी ब्रिज बेदी यांच्याशी1972 मध्ये लग्न केले. तीन वर्षांनी त्यांच्या मुलीचा जन्म झाला. पण, काही काळाने त्यांचे पतीसोबतचे संबंध बिघडले होते. दोघांनी कधीही घटस्फोट घेतला नाही. 31 जानेवारी 2016 रोजी ब्रिज यांचे निधन झाले. किरण यांच्या मुलीचे नाव सायना असून ती सामाजिक कार्यात आहे. ती एक एनजीओही चालवते. तिने एका कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीने किरण बेदी यांच्या पुस्तकावर 'गलती किसकी है' ही सिरिअल काढली होती.