अभिनेते किरण माने यांनी 'मुलगी झाली हो' ही मालिका आणि 'बिग बॉस मराठी सीझन ४'मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सध्या ते 'सिंधूताई माझी माई- गोष्ट चिंधीची' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान किरण सोशल मीडियावर विशेष चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे, जिने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
किरण मानेंनी सोशल मिडीयावर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसाबद्दल खास पोस्ट केली आहे.
किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं..
"खरंच देशाची आर्थिक स्थिती इतकी वाईट आहे का?" नव्यानं निवडून गेलेले त्यावेळचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी अर्थमंत्रालयातून आलेली आठ पानांची नोट वाचली आणि कॅबिनेट सेक्रेटरी नरेश चंद्रांना विचारलं.. चंद्रांनी उत्तर दिलं "नाही… याहूनही खूप वाईट आहे"...नरसिंहरावांचं टेन्शन वाढलं.
लै बेक्कार काळ होता दोस्तांनो.. भारतीय अर्थव्यवस्थेनं पार जीवच सोडलावता.. शेवटच्या घटका ! त्यात तिकडं आखाती युद्धाला सुरुवात झाल्यामुळं तेलाच्या दरांचा भडका उडवलावता. पन नरसिंहराव लै धोरनी आन् हुशार मानूस. त्यांनी वळखलं की आर्थिक पेच सोडवन्यासाठी अर्थमंत्रीपदावर कुनीबी ऐरागैरा, पक्षाच्या मर्जीतला कुनी थातूरमातूर खासदार बसवून चालणार नाय. नायतर पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे दुष्परीनाम भोगायला लागतील.
..त्यांनी तातडीनं 'अर्थव्यवस्था' या विषयातील अशा अभ्यासू-तज्ञ-बुद्धिमान व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली, जो राजकारणाबाहेरचा असेल.. त्यावेळी त्यांना समजलं की भारतात एक असा अर्थतज्ञ प्राध्यापक आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता आहे.. रावांनी खोलात जाऊन त्याची माहिती काढली.. त्यानंतर त्यांना आशा वाटली, की या भयाण परीस्थितीत देशाला तारू शकेल असा एकच अत्यंत अभ्यासू-प्रतिभावान-खतरनाक मानूस आहे, वन ॲन्ड ओन्ली, द ग्रेट डाॅ. मनमोहन सिंग!
पन गडी राजकारनाबाहेरचा. शिक्षक. तयार होईल का नाय? ते काम पी.सी. अलेक्झांडर यांनी केलं. सिंग तयार झाले. हा 'होकार' पुढे देशाच्या उत्कर्षात खूप महत्त्वाचा ठरणार आहे असा थोडासाही अंदाज कुणाला आला नसंल !
मनमोहन सिंग यांनी पदावर आल्यापासूनच कामाचा धडाकाच लावला.. पहिल्या झटक्यात मनमोहनसिंगांनी निधड्या छातीनं पत्रकार परीषद घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेचं भयाणभेसूर चित्र, न लपवता उघडपणे सर्वांसमोर मांडलं. निवडणुकीच्या काळात काँग्रेस पक्षानं काही अत्यावश्यक वस्तूंची यादी देऊन हे दर शंभर दिवसांत स्थिर करून मागे नेऊ असं आश्वासन दिलंवतं.. मात्र सिंग यांनी स्पष्ट सांगीतलं, "हे शक्य नाही. आपल्याकडं अशी कुठलीही जादूची छडी नाही."
झालं ! काँग्रेस पक्षात भूकंपच झाला. सगळे म्हनायला लागले "आवो पी.एम्, काय बोलतायत हे? इतकं खरं बोलायचं असतं व्हय जनतेशी??" ...पण पी.व्ही. नरसिंहराव हलक्या कानाचे आणि कच्च्या गुरूचे चेले नव्हते...त्यांनी लै दूरचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भल्याचा विचार करून या माणसाची निवड केलीवती.
१९९१ च्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणाची सुरूवात मनमोहनसिंग यांनी व्हिक्टर ह्यूगो याच्या वाक्यानं केली, "ज्या विचारांची वेळ आली आहे, त्याला जगातली कुठलीही ताकद रोखू शकत नाही."
त्यानंतर देशात जी हवा आली भावांनो, ती याआधी कधीच आली नव्हती. मरणाच्या दारात असलेली आपली अर्थव्यवस्था फक्त रूळावरच आली नाही, तर तिनं बुलेट ट्रेनच्या दहापट वेग पकडला. आज जगभर इकाॅनाॅमीचे शिक्षण देणार्या युनिव्हर्सिटीजमध्ये मनमोहन सिंगांना 'भारताच्या आर्थिक क्रांतीचा जनक' म्हणून ओळखलं जातं मित्रांनो... भारताला जगाची दारं उघडून देणार्या जागतिकीकरणाची सुरूवात करताना १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी घेतलेले अभूतपूर्व निर्णय जगभर अभ्यासले जातात ! मनरेगा सारख्या अफलातून निर्णयांनी प्रत्येक हाताला काम मिळालं..गोरगरीबांच्या घराघरात चूल पेटली...
असो. तर आपल्याकडं अशी लै लै लै ग्रेट मानसं हायत भावांनो. आपला देश महान हाय त्यो अशा दूरदर्शी आनि बुद्धीमान लोकांमुळंच !वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा सरदार मनमोहन सिंग ! कडकडीत सलाम"
या शब्दात किरण माने यांनी मनमोहन सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. किरण माने यांची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनमोहन सिंग यांचा काही फोटोही शेअर केले आहेत.