'बिग बॉस मराठी' फेम किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मालिका आणि नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे माने समाजातील अनेक घडामोडींवर पोस्टद्वारे अगदी परखडपणे त्यांचं मत व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या पोस्ट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. नुकतंच त्यांनी सिनेसृष्टीची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
किरण मानेंनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सोनाली बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. एका कार्यक्रमातनिमित्त नुकतंच माने आणि सोनाली भेटले होते. हा फोटो शेअर करत मानेंनी सोनालीसाठी पोस्ट लिहिली आहे.
'संविधान प्रेमी कलाकार' कार्यक्रमात माझ्यासोबत सोनाली कुलकर्णी होती. लै लै लै भारी वाटलं तिला भेटून. तिच्या पहिल्या एकांकिकेपास्नं मी तिचा प्रवास बघितलाय. पुण्यातल्या तिच्या 'समन्वय' या ग्रुपमध्ये कामबी केलंय. आमच्या प्रत्यक्ष भेटी लै कमी झाल्यात, पण आज इतकी मोठी होऊनही ती पुर्वीइतकीच आपुलकीनं बोलते. माझ्या पोस्टस् ती आवर्जुन वाचत असते. आजबी भेटल्या-भेटल्या कौतुक करत म्हणाली, "किरण, तू ठाम भुमिका घेतोस याचं कारण म्हणजे तुझं वाचन आणि अभ्यास."
आम्ही समविचारी आहोतच पण आम्हाला जोडणारा दूसरा धागा म्हणजे दूबेजी ! माझ्या 'परफेक्ट मिसमॅच' या नाटकासाठी मी तिला विचारलं होतं. नाटक तिला लै आवडलं होतं.. पण त्यावेळी तिचं 'व्हाईट लिली नाईट रायडर' हे हिंदी नाटक सुरू होतं. त्यामुळे ते राहुन गेलं. पण त्यावेळी तिनं माझ्या डोक्यात एक किडा सोडून दिला होता, "किरण, परफेक्ट मिसमॅच वर सिनेमा खूप छान होईल. मला त्यात काम करायला आवडेल. एवढंच नाही तर मला त्या फिल्मच्या अख्ख्या प्रोसेसमध्ये रहायला आवडेल. त्याच्या साऊंड डिझाईनवर खूप क्रिएटिव्ह काम करता येऊ शकतं. बघ, विचार कर."...नंतर मी अमृता सुभाषबरोबर ते नाटक केलं, पण सोनालीनं सोडलेला तो किडा मला शांत बसू देत नव्हता.
मी आत्ता त्या नाटकावर सिनेमा लिहीतोय. जाणीवपूर्वक साऊंड डिझाईनवर स्पेशल सुचना लिहीताना कायम लैच कृतज्ञतापूर्वक तिची आठवण येते. तिनं त्यावेळी हे सुचवलं नसतं तर कदाचित त्या अतिशय महत्त्वाच्या भागाकडं माझं दुर्लक्ष झालं असतं.
सोनालीनं बॉलीवूडमध्ये लै नांव कमावलं. आंतरराष्ट्रीय सिनेमांमधनंबी कामं केली. तरीही आमच्या 'अंधश्रद्धा निर्मुलन समिती'शी असलेलं जुनं नातं टिकवून तिनं समाजभान जपलंय. आजही ती अत्यंत बिझी असूनही संभाजी भगत यांच्या विनंतीचा मान राखून संविधान प्रेमी कलावंतांच्या मेळाव्याला आली. सोनालीची हीच गोष्ट तिला इतर मराठी अभिनेत्रींपेक्षा एक पायरी वर नेते.
सोनाली, तू अशीच गोड आणि डाऊन टू अर्थ रहा. लब्यू
मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, सोनालीने मराठीबरोबरच बॉलिवूडही गाजवलं आहे. अनेक हिंदी चित्रपटांत ती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसली. सैफ अली खानबरोबरच 'दिल चाहता है' चित्रपटात सोनाली झळकली होती. तिच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं होतं.