देशातील लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस म्हणून आणीबाणीचा दिवस ओळखला जातो. 25 जून 1975 रोजी देशात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी घोषित केली होती. आज आणीबाणीच्या घोषणेला 44 वर्ष पूर्ण झाले आहेत. याच आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घातली गेली होती. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर किशोर कुमार यांची गाणी व चित्रपट दाखवण्यास व वाजवण्यावर बंदी लादण्यात आली होती.
होय, तत्कालिन इंदिरा गांधी सरकारने आणीबाणीकाळात २० सूत्री कार्यक्रम बनवला होता. सरकारसाठी याचा प्रचार-प्रसार महत्त्वपूर्ण होता. तत्कालिन माहिती व प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ला या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी किशोर कुमार यांची मदत मागितली होती. त्याकाळात किशोर कुमार हे यशाच्या शिखरावर होते. लोकांच्या मनावर राज्य करत होते. त्यामुळे विद्याचरण शुक्ला यांनी किशोर कुमार यांना मुंबईतील काँग्रेसच्या सभेत गाणे गाण्याचा प्रस्ताव ठेवला. पण किशोर कुमार यांनी यास नकार दिला आणि नेमका हाच नकार काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागला होता.
याचाच परिणाम म्हणजे, यानंतर ऑल इंडिया रेडिओ आणि दुरदर्शनवर किशोर कुमार यांची गाणी प्रसारित करण्यावर बंदी घालण्यात आली होती. केवळ इतकेच नाही तर किशोर कुमार यांच्या गाण्यांच्या ग्रामोफोन रेकॉर्डस विक्रीवरही बंदी लादण्यात आली होती. साधारण तीनवर्षे ही बंदी कायम होती. अर्थात किशोर कुमार यांना या बंदीमुळे काहीही फरक पडला नाही.
किशोर कुमार तत्त्वांचे पक्के होते. एकदा ते यावर बोलले होते.‘ ते माझ्याकडे का आलेत होते, मला ठाऊक नाहीत. पण कुणीही माझ्या इच्छेविरोधात माझ्याकडून कुठलेही काम करून घेऊ शकत नाही. मी कुणाच्याही आदेशानुसार वा इच्छेनुसार गात नाही, ’असे ते म्हणाले होते.