खूप चांगला काळ मी त्यांच्या बरोबर घालवला आहे.'मोरूची मावशी' या नाटकात त्यांच्याबरोबर मी काम केले होते. खूप चांगल्या गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेता आल्या. या घडीला एक कलाकार आणि चांगले व्यक्तिमत्त्व, गमावल्याचे दुःख आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये त्यांची भेट व्हायची. जेव्हा त्यांना पुरस्कार मिळाले त्यावेळी मी ही आवर्जुन त्या सोहळ्यांत उपस्थित असायची. 'धुमाकुळ' सिनेमात तर विजु आणि मी नवरा बायको होतो. असे बरेच सिनेमा एकत्र केले आहेत. सतत हसतमुख आणि खूप मनमोकळा त्यांचा स्वभाव होता. खूप सकारात्मक दुष्टीकोण, सतत सा-यांचे शेवटपर्यंत मनोरंजन करणे हेच त्यांचे ध्येय ते साधत आले. त्यांच्या भूमिका असो किंवा त्यांच्या बरोबर घालवलेला काळ अशा सगळ्याच गोष्टी नेहमीच लक्षात राहतील.यांच्या दिलखुलास आणि कसदार अभिनयानं रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. नक्कीच त्यांच्या एक्झिटमुळं कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण झालीय.
मराठी सिनेसृष्टीतला तारा निखळला,ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे.मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीचे मोठं नुकसान झाले आहे.
विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले.