अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘पुकार’ चित्रपटातील ‘किस्मत से तुम हमको मिले हो, कैसे छोडेंगे ये हाथ हम ना छोडेंगे...’, हे सोनू निगमसोबतचं माझं गाणं खूप लोकप्रिय झालं आहे. या गाण्याची ऑफर मला सुरांचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगीतकार ए. आर. रेहमान यांच्याकडून मिळाली. गाणं रेकॅार्ड करण्यासाठी त्यांनी मला त्यांच्या चेन्नईतील स्टुडिओमध्ये बोलावलं. तिथे फक्त क्लीक ट्रॅक होता. गाण्याचं पूर्ण म्युझिक तयार नव्हतं. रेहमान यांनी मला रफ ट्यून गुणगुणून दाखवली. ते म्हणाले, ही बेसिक ट्यून आहे. त्यावर तुम्हाला गाणं गायचं आहे. प्रथम बेसिक ट्यून ऐकवून मग त्यावर संगीतरचना करण्याची कदाचित त्यांच्या कामाची पद्धत असावी. बेसिक ट्यून देऊन रेहमान आर्टिस्टला त्यावर इम्प्रोवाईज करायला सांगतात. गायकाला त्यांच्या पद्धतीनं पाहिजे तसं गाण्याची मोकळीक देतात. क्लीक ट्रॅकवर मी पहिल्यांदाच गात होते. रेहमान यांनी मला एक तान गाऊन दाखवली आणि सांगितलं की, यात ही जी तान आहे, ती ट्यून महत्त्वाची आहे. बाकी गाणं तुम्ही तुमच्या पद्धतीने गा, पण, मला ही तान अशीच हवी आहे. गाण्याला मला हा टच पाहिजे. त्यांनी सांगितलेल्या सूचनांचं पालन करत मी पहिल्यांदाच क्लीक ट्रॅकवर गाणं गायलं.
किस्मत से तुम हमको मिले होकैसे छोड़ेंगे ये हाथ हम ना छोड़ेंगेफिर से बनती तकदिरों कोअरमानों की ज़ंजीरों को जानम अब ना तोड़ेंगेकिस्मत से तुम हमको मिले होकैसे छोड़ेंगे ये हाथ हम ना छोड़ेंगेफिर से बनती तकदिरों कोअरमानों की ज़ंजीरों को जानम अब ना तोड़ेंगे...
दोन महिन्यांनी जेव्हा हे गाणं रिलीज झालं, तेव्हा माझा मुलगा आदित्यनं मला त्या गाण्याबद्दल सांगितलं. कारण मार्केटमध्ये येणाऱ्या नवनवीन गोष्टींबाबत तो अपडेट असायचा. तो म्हणाला, मम्मी आपण एक गाणं चेन्नईमध्ये जाऊन रात्री रेकाॅर्ड केलं होतं, ते गाणं रिलीज झालं आहे. तू फक्त बघ, त्यात रेहमान यांनी आपल्या संगीताची जादू कशी बिखरली आहे. मी केवळ क्लीक ट्रॅकवर गायलेलं गाणं रेहमान यांनी संगीताच्या बळावर कुठल्या कुठे नेऊन ठेवलं. ते गाणं आजही खूप पॅाप्युलर आहे. रेहमान यांनी रेकॅार्डिंगच्या वेळीच गाण्याचं कौतुक केलं होतं. गाणं व्हायरल झाल्यानंतर रेहमान यांची भेट झाली नाही. संगीतप्रेमींकडून मिळालेला रिस्पॅान्सच माझ्यासाठी कौतुकाची थाप ठरली. सर्वांनी हे गाणं डोक्यावर घेतलं. गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.