Join us

Naseeruddin Shah: "असे असेल तर ताज महाल, लाल किल्ला, कुतूबमिनार पाडून टाका"; नसीरूद्दीन शाह भडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 16:25 IST

मुघल आपला देश लुटायला आले नव्हते, त्याऐवजी जे लोक त्यांच्यावर टीका करतात ते..."

Naseeruddin Shah: ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह आपल्या रोखठोक विधानांमुळे चर्चेत असतात. एकीकडे जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन त्यांना दहशतवादावरून सुनावले, त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे. तशातच, नसीरुद्दीन शाह मात्र मुघल साम्राज्याचे कौतुक केल्यामुळे चर्चेत आले आहेत. 'ताज - डिव्हायडेड बाय ब्लड' ही वेबसिरीज रिलीज होण्यापूर्वीच, त्यांचे विधान चर्चेचा विषय ठरला आहे. मुघलांना विनाशकारी म्हटल्याबद्दल नसीरूद्दीन शाह नाराजी व्यक्त केली असून, मुघलांनी देशाचे नुकसान केले असे वाटत असेल तर ताज महाल, लाल किल्ला, कुतूबमिनार पाडून टाका, असे नसीरूद्दीन म्हणाले.

मुघल कालखंडावर सतत प्रश्न उपस्थित होत असताना नसीरुद्दीन शाह यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी संवाद साधताना सडेतोड भाष्य केले. "मला आश्चर्य वाटते आणि ते खूप मजेदारही आहे की काही असे लोक आहेत जे अकबर आणि नादिरशाह किंवा बाबरचा पणजोबा तैमूरसारख्या आक्रमक मुघल बादशाहमधला फरक सांगू शकत नाहीत. पण काही लोक मुघलांबद्दल विचित्र दावे करत आहेत. हेच लोक इथे लुटायला आले होते. मुघल मात्र इथे काहीही लुटायला आले नव्हते. ते या देशाला आपले घर बनवण्यासाठी आले होते आणि त्यांनी तेच केले. त्यामुळे त्यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही?'

"जे लोक हे बोलत आहेत ते काही प्रमाणात बरोबरही आहेत की मुघलांचा गौरव आपल्या स्वदेशी परंपरांच्या हिमतीवर झाला. कदाचित ते खरे असेल, परंतु त्यांना खलनायक बनवण्याची गरज नाही. जर मुघल साम्राज्य इतके राक्षसी, इतके विध्वंसक होते, तर त्याला विरोध करणारे लोक त्यांनी बांधलेली स्मारके का पाडत नाहीत? त्यांनी जे काही केले ते भयंकर असेल, तर ताजमहाल पाडून टाका, लाल किल्ला जमीनदोस्त करा, कुतुबमिनार भुईसपाट करा. लाल किल्ल्याला आपण पवित्र का मानतो, तो तर मुघलांनी बांधला होता. त्यामुळे मला असं वाटतं की जरी मुघलांबद्दल गौरवोद्गार काढायचे नसतील तरी त्यांच्या त्यांची बदनामी करण्याचीही काहीच गरज नाही," असे रोखठोक मत नसीरूद्दीन शाह यांनी मांडले.

"जिथे लोकांकडे इतिहासाबद्दल योग्य माहिती आणि योग्य युक्तिवाद नाही, तिथे द्वेष आणि चुकीची माहिती दिली जाते. कदाचित यामुळेच आता देशातील एक वर्ग भूतकाळाला, विशेषत: मुघल साम्राज्याला दोष देत राहतो आणि यामुळे मला राग येत नाही, तर त्यांच्यावर खूप हसायला येतं," असेही नसीरूद्दीन शाह म्हणाले.

टॅग्स :नसिरुद्दीन शाहबॉलिवूडताजमहाललाल किल्ला