Join us

TDM Marathi Movie: ऑफिस बॉय थेट सिनेमाचा हिरो झाला ना राव...! 'टीडीएम'च्या नायक-नायिकेची भन्नाट स्टोरी...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2023 12:03 PM

TDM Marathi Movie: भाऊसाहेब कर्‍हाडेंच्या TDM ची नायिका कालिंदी आणि नायक पृथ्वीराजअशी अशी झालेली निवड... ही पडद्यामागची कहाणी वाचून थक्क व्हाल...

TDM Marathi Movie: एक आगळावेगळा विषय, एक आगळीवेगळी कथा घेऊन 'टीडीएम' (TDM Marathi Movie) हा मराठी चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.  राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमाची सध्या जबरदस्त हवा आहे. चित्रपटातील 'एक फुल', 'बकुळा' ही गाणी तर तुफान लोकप्रिय झाली आहेत. या चित्रपटाची आणखी एक खासियत आहे. होय, ती म्हणजे या चित्रपटातून एक नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. या दोघांचं कास्टिंग आणि त्यामागचा किस्सा फारच इंटरेस्टिंग आहे.

होय, कालिंदी पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करणारी एक सामान्य मुलगी तर पृथ्वीराज हा भाऊराव कऱ्हाडे यांच्या ऑफिसमधला ऑफिसबॉय. आज हे दोघं 'टीडीएम'चे नायक नायिका आहेत.

अशी झाली कालिंदीची निवड...कालिंदी ही पुण्यात स्पर्धा परिक्षेची तयारी करत होती. हिरोईन वगैरे व्हायचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. रूममेटकडून तिला चित्रपटाबद्दल कळलं. भाऊराव आपल्या चित्रपटासाठी नायिका शोधत होते. रूममेटकडून कालिंदीला याबद्दल कळलं. भाऊराव यांना सरळ नाक, मोठे डोळे,लांब केस अशी नायिका हवी होती. या सगळ्या गोष्टी कालिंदीत होत्या. मग रूममेटच्या आग्रहाखातर तिने फोटो पाठवला. यानंतर तिची स्क्रीनटेस्ट झाली. ऑडिशन झाली. यानंतर अनेक दिवसानंतर तिला तिचं सिलेक्शन झाल्याचं कळलं.

 शेती, प्रॉडक्शन, ऑफिस बॉय ते नायक...पृथ्वीराज हा सिनेमाच्या नायकाची स्टोरीही भन्नाट आहे. तो आधी गावाकडे शेती करायचा. पण सिनेमाची आवड होती. मुंबईत फिल्म सिटीत काही काम मिळतं का, दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरू होते.  भाऊराव   कऱ्हाडे यांच्या ख्वाडा सिनेमाचं शूटींग सुरू असताना पृथ्वीराज असाच सहज म्हणून सेटवर गेला होता. भाऊराव व त्याची काहीही ओळख नव्हती. बबन या चित्रपटाच्या वेळी त्याने भाऊराव यांना गाठलं. मला प्रॉडक्शनला तरी काम द्या, असं तो म्हणाला. भाऊराव यांनी त्याला प्रॉडक्शनला काम दिलं. बबनच्या हिरोचा बॉय म्हणून पृथ्वीराजने काम केलं. बबनचं शूट संपल्यानंतर सगळे पुण्याला पांगले. पृथ्वीराज मात्र गावाला परतला. पण तिथे त्याला स्वस्थ बसवेना. तो पुन्हा भाऊराव यांच्याकडे गेला आणि मला काम द्या, मी काहीही करायला तयार आहे, असं म्हणत त्याने पुन्हा विनंती केली. भाऊराव यांनी त्याला ऑफिस बाॅय म्हणून काम दिलं. पृथ्वीराज त्यांच्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करू लागला. हा ऑफिस बॉय भाऊरावांच्या सिनेमाचा हिरो बनेल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. खुद्द पृथ्वीराजनेही तशी अपेक्षा केली नव्हती. पण पृथ्वीराजमध्ये असे काही गुण होते की, हाच आपला हिरो यावर भाऊराव ठाम होते. तू तयारी कर, असं त्यांनी पृथ्वीराजला सांगितलं. आपल्याला छोटीमोठी भूमिका मिळेल, अशी पृथ्वराजची अपेक्षा होती. पण तूच लीड भूमिका करताय, असं त्याला सांगितलं गेलं, तेव्हा क्षणभर त्याचाही विश्वास बसेना. सर आपली फिरकी घेत आहेत, असंच त्याला वाटलं. पण भाऊराव यांना पृथ्वीराजमध्ये वेगळं काही दिसलं होतं. त्यामुळे त्यांनी त्याला हिरो म्हणून निवडलं आणि त्यांची निवड योग्य ठरली...

'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलली आहे.  28 एप्रिल 2023 ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

टॅग्स :भाऊराव क-हाडेमराठी अभिनेतामराठी चित्रपट