‘पावनखिंड’ (Pawankhind)हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. चित्रपट अप्रतिम आहेच, पण या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचा अभिनयही तितकाच अप्रतिम आहे. साहजिकच चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडत आहेत. या चित्रपटात श्रीमंत रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे, अभिनेता अंकित मोहन (Ankit Mohan) याने. आज आम्ही त्याच्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. अंकितची पत्नी ही देखील एक उत्तम अभिनेत्री आहे.
अभिनेत्री रूची सवर्ण (Ruchi Savarn) ही अंकितची पत्नी आहे. खास म्हणजे, तिनेही ‘पावनखिंड’ चित्रपटात मातोश्री सोयराबाई राणीसरकार यांची भूमिका साकारली आहे.
रूची आणि अंकितने याआधी दिग्पाल लांजेकरच्या फत्तेशिकस्त आणि फर्जंद या चित्रपटातही भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही सिनेमात रूची सोयराबाईच्या भूमिकेत झळकली होती. अंकित ‘फर्जंद’मध्ये मुख्य भूमिकेत होता तर ‘फत्तेशिकस्त’मध्ये त्याने येसाजी कंक यांची भूमिका जिवंत केली होती.
अंकित मोहनने ‘फर्जंद’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. अंकित हा अमराठी असून हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील तो प्रसिद्ध चेहरा आहे. अंकितने ‘एमटीव्ही रोडीज’च्या चौथ्या पर्वात सहभागी होऊन छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतली. स्टार प्लस वाहिनीवरील ‘महाभारत’ या मालिकेत अश्वात्माच्या भूमिकेतून तो घराघरांत लोकप्रिय झाला. याशिवाय झी टीव्हीवरील ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत त्याने साकारलेली आकाश ही व्यक्तिरेखाही बरीच गाजली होती. मिले जब हम तूम, नमक हराम, बसेरा, शोभा सोमनाथ की, तेरी मेरी लव्ह स्टोरीज, घर आजा परदेसी,बेगुसराय या मालिकांमध्ये त्याने काम केले आहे.
अंकितच्या पत्नीचे नाव रुची सवर्ण हिने ‘सखी’ या गाजलेल्या मराठी मालिकेत ा्रमुख भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर ती तमन्ना आणि अजीब दास्ताँ है ये या हिंदी मालिकांमध्ये झळकली. अंकित आणि रुची यांचे लव्ह मॅरेज आहे. 2013 मध्ये ‘घर आजा परदेसी’ या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. या मालिकेत दोघेही काम करत होते. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर डिसेंबर 2015 मध्ये अंकित आणि रुची लग्नाच्या बेडीत अडकले होते.