सध्या नेटफ्लिक्सवरील Sacred Games ही सीरिज फारच गाजत आहे. प्रत्येक भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. काही कलाकार हे ओळखीचे होते तर काही नवीन किंवा याआधी फार प्रकाशझोतात न आलेले चेहरेही यातून लोकप्रिय झाले आहेत. यातीलच एक चर्चेचा विषय ठरत असलेली कलाकार म्हणजे नवाझुद्दीनच्या पत्नीची भूमिका साकारणारी राजश्री देशपांडे. कोण आहे ही राजश्री देशपांडे? चला जाणून घेऊया तिच्या प्रवासाबद्दल.....
राजश्री देशपांडे ही मुळची औरंगाबाद शहरातील आहे. पुणे शहरातील सिंबायोसिस कॉलेजमधून तिने लॉ ची डिग्री घेतली तर त्याच कॉलेजमधून तिने अॅडव्हरटायझिंगमधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.
राजश्रीने बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं ते २०१२ साली. आमिर खानच्या 'तलाश' सिनेमात तिला एक छोटी भूमिका मिळाली होती. त्यानंतर राजश्रीने मालिकांकडे आपला मोर्चा वळवला. 'कुछ तो लोग कहेंगे' या मालिकेत तिने काम केले.
त्यानंतर पुन्हा राजश्री मोठ्या पडद्याकडे परतली. यावेळी तिला सलमान खानच्या 'किक' सिनेमात काम मिळालं. पण ही सुद्धा भूमिका लहान होती. पुढे तिने 'हरम' या मल्याळम सिनेमात काम केलं. यात तिला डबल रोल साकारायला मिळाला.
राजश्री सर्वात जास्त चर्चेत आली ती जेव्हा वादग्रस्त ठरलेल्या 'सेक्सी दुर्गा' मध्ये मुख्य दुर्गाची भूमिका साकारली होती. या सिनेमाला अनेक पुरस्कारही मिळाले.
त्यानंतर राजश्रीने तिचं डिजिटल डेब्यू केलं ते बीबीसीच्या 'वन्स माफिया' मधून. त्यानंतर आता तिची नेटफ्लिक्सवरील Sacred Games मधील भूमिका गाजत आहे.
राजश्रीने ही नंदीता दासच्या 'मंटो' मध्येही एक महत्वाची भूमिका साकारली आहे. यातही नवाझुद्दीन मुख्य भूमिकेत आहे.