Join us

'ती' व्यक्ती अक्षय कुमारला म्हणाली होती, इंडस्ट्रीत तुला कधीच काम मिळणार नाही...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2023 12:24 PM

अक्षय कुमारचा इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हताच. कदाचित या संघषार्मुळेच अक्षय बॉलिवूडमधला ‘सबसे बडा खिलाडी; ठरला.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा आज ( ९सप्टेंबर  ) वाढदिवस. सध्या अक्षय जाम बिझी आहे.  अलीकडच्या काळात काहीशा सामाजिक आशयांच्या चित्रपटांकडे वळलेला अक्षय निर्विवाद एक सुपरस्टार आहे. . अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणार्‍यांपैकी एक आहे. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हताच. कदाचित या संघषार्मुळेच अक्षय बॉलिवूडमधला ‘सबसे बडा खिलाडी; ठरला. आधी केवळ अ‍ॅक्शनपट करणारा अक्षयकुमार अशीच त्याची ओळख होती. पण नंतर अ‍ॅक्शनसोबत कॉमेडीही त्याने स्विकारली.

१९९० मध्ये अक्षयने ‘खिलाडी’ म्हणून स्वत:चे स्थान निर्माण केले. १९९९ मध्ये असाच एक चित्रपट होता, तो म्हणजे ‘संघर्ष’. १९ वर्षांपूर्वी आलेला हा चित्रपट हिट तर झालाच पण या चित्रपटाने अक्षयला गंभीर अभिनेत्यांच्या रांगेत नेऊन बसवले. यात चाहत्यांना अक्षयची अ‍ॅक्शन कमी अन् त्याचा सीरिअस अंदाज जास्त भावला.

लहान असताना अक्षय अतिशय खोडकर म्हणून म्हणून प्रसिध्द होता. अभ्यासात जराही रस नसलेल्या अक्षयला क्रिकेट आणि व्हॉलिबॉलसारख्या खेळात गती होती. वयाच्या आठव्या वर्षी त्याने मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. मार्शल आर्ट शिकण्यासाठी तो बँकॉकला गेला होता. यानंतर थायलंडला जाऊन त्याने मौय थायचे प्रशिक्षण घेतले. या काळात तेथील हॉटेलमध्ये शेफ आणि वेटरचे कामही त्याने केले.

चित्रपटसृष्टीतील संघर्षाच्या काळात अक्षयला सर्वप्रथम मॉडेलिंगची एक आॅफर मिळाली. यासाठी त्याला संध्याकाळी ६ ची फ्लाईट घ्यायची होती. त्या दिवशी सकाळी ५ वाजता अक्षय कुमार उठला आणि व्यायामासाठी तयार होत असतानाच त्याचा फोन वाजला. पलीकडची व्यक्ती प्रचंड चिडलेली होती. तुझ्यासारख्या अनप्रोफेशनल व्यक्तिला कधीच काम मिळणार नाही, असे ती व्यक्ती म्हणाली. अक्षय हे ऐकून अवाक् झाला. त्याने आपले एअरतिकिट पुन्हा एकदा तपासून बघितले तर, त्यावर आदल्या दिवशी सकाळी ६ वाजताची वेळ होती. अशारितीने अक्षयची ती पहिली संधी हुकली. पण या हुकलेल्या संधीने अक्षयला एक सुवर्णसंधी मिळवून दिली.

होय, मॉडेलिंगची संधी हुकल्याने अक्षय काहीसा हिरमुसला होता. त्याच अवस्थेत नटराज स्टुडिओमध्ये तो सहज फिरत असताना त्याला दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती भेटले. प्रमोद चक्रवर्तींनी अक्षयचे फोटो बघितले होते. अक्षय त्यांना अचानक भेटला. तू माझ्या पुढचा चित्रपटाचा हिरो आहे, असे प्रमोद अक्षयला पाहून म्हणाले. हा चित्रपट होता ‘दीदार’. खरे ‘दीदार’ हा अक्षयचा पहिला चित्रपट होता. पण तो १९९२ मध्ये रिलीज झाला. त्याआधी १९९१ मध्ये ‘सौगंध’ रिलीज झाला आणि हा अक्षयचा डेब्यू चित्रपट ठरला. यानंतर अक्षयने कधीच मागे वळून पाहिले नाही. तो प्रयत्न करत राहिला. त्याच्या या कठोर प्रयत्नांचेच फळ आहे की, आज तो सगळ्यात बिझी सुपरस्टार आहे.

टॅग्स :अक्षय कुमार