बॉलिवूडमधील अजरामर ठरलेला चित्रपट म्हणजे 'शोले'. या चित्रपटातील प्रत्येक पात्र त्याकाळी तुफान गाजलं. आजही या कलाकारांची आणि चित्रपटाची भुरळ प्रेक्षकांवर कायम आहे. जय, वीरु, बसंती आणि गब्बर या सगळ्यांनीच प्रेक्षकांची मनं जिंकली. विशेष म्हणजे गब्बर या भूमिकेमुळे अमजद खान (amjad khan) यांची कलाविश्वात एक वेगळी ओळख निर्माण झाली. सध्या सोशल मीडियावर अमजद खान यांचा एक जुना किस्सा चर्चिला जात आहे. विमानाचा प्रवास टाळण्यासाठी अमजद खान यांनी कारने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परंतु, यावेळी त्यांचा मोठा अपघात झाला आणि त्यानंतर त्यांचं नशीब पूर्णपणे पालटून गेलं.
१९७९ मध्ये आलेला द ग्रेट गँबलर हा चित्रपट साऱ्यांनाच ठावूक असेल. यात अमिताभ बच्चनने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु, ही भूमिका प्रथम अमजद खान यांना ऑफर करण्यात आली होती. या चित्रपटाच्या सेटवर पोहोचण्यासाठी अमजद खान निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांचा मोठा अपघात झाला.
'द ग्रेट गँबलर' या चित्रपटाचं गोव्यात चित्रीकरण सुरु होतं. त्यामुळे अमजद खान यांना तातडीने गोव्याला रवाना व्हायचं होतं. मात्र, इतक्या घाईत त्यांना विमान वा रेल्वेची तिकीटं मिळणं शक्य नव्हतं. तसंच त्यांना विमानानेदेखील प्रवास करायचा नव्हता. त्यामुळे ते स्वत:ची कार घेऊन कुटुंबासह गोव्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र, गोव्याला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मोठा अपघात झाला. अमजद खान यांच्या कारचा अपघात झाल्यानंतर तेथील स्थानिकांना त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ गोव्यातील पंजीम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं. परंतु, अमजद खान यांची प्रकृती प्रचंड नाजूक होती. त्यातच रक्ताचीही कमतरता होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी स्वत: त्यांचं रक्त अमजद खानला दिला.
दरम्यान, या अपघातानंतर अमजद खान यांना मोठ्या प्रमाणावर स्टेरॉइड देण्यात आलं होतं. ज्यामुळे त्यांचं वजन दिवसेंदिवस वाढत होतं. परिणामी, वाढतं वजन आणि स्थुलता यामुळे त्यांना कोणत्या चित्रपटातही काम मिळेनासं झालं. इतकंच नाही तर वाढत्या वजनामुळे त्यांना २७ जुलै १९९२ मध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांना प्राण गमवावे लागले.