Nitin Gadkari Khupte Tithe Gupte: प्रसिद्ध संगीतकार, दिग्दर्शक, निर्माता असलेल्या अवधूत गुप्ते याच्या खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात एकामागून एक राजकीय मंडळी येताना पाहायला मिळत आहेत. यातच केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात उपस्थिती लावली. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मनमोकळ्या गप्पा मारत, अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना तेवढीच दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी नितीन गडकरी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यातली खुपणारी गोष्ट काय, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर नितीन गडकरींनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.
महाराष्ट्राची राजकीय परंपरा देशातल्या राजकारणापेक्षा वेगळी आहे. वैचारिक मतभेद असतील पण मनभेद नव्हते. मी पण १८ वर्षे विधीमंडळात होतो. कठोर टीका करायचो आम्ही पण व्यक्तिगत मैत्री होती. आता थोडे जास्त झाल्यासारखं वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्वसामान्य माणसाला कंटाळा आला आहे. त्याचा रस या राजकारणात नाही, तुम्ही काय काम करता त्यात आहे, असे नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे सांगितले.
नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची कोणती गोष्ट खुपते?
नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची कोणती गोष्ट खुपते, असा प्रश्न नितिन गडकरी यांना विचारण्यात आला. यावर बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी खुपणारी गोष्ट म्हणजे, ते स्वतः खूप काम करतात, परिश्रम करतात आणि सगळ्यांना काम करायला लावतात. त्यात लोक थकून जातात. अमित शाह हे कायम गंभीर असतात. टेन्शनमध्ये असल्यासारखे वाटतात असे म्हणत त्यांच्यातली खुपणारी गोष्ट काय आहे ते नितीन गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात मॅजिक बॉक्स नावाचा एक सेगमेंट आहे. त्यात एक एक फोटो समोर येतो आणि त्यातली खुपणारी गोष्ट सांगायची असते. या दोघांचे फोटो समोर आल्यावर नितीन गडकरी यांनी त्यांच्याविषयी ही दोन उत्तरे दिली आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांचा फोटो आला तेव्हा शरद पवार हे स्पष्ट कधीच बोलत नाहीत ते आपल्याला खुपते असे नितीन गडकरींनी म्हटले आहे.