जुही चावला तिचे सौंदर्य आणि तिच्या चुलबुली अंदाजामुळे लोकप्रिय झाली होती. कयामत से कयामतमुळे आमिर खान आणि जुही चावलाची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. बॉलीवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानने रुपेरी पडद्यावर विविधरंगी भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली. कोणत्याही भूमिकेला न्याय देण्यासाठी जीव ओतून अभिनय करणारा अभिनेता अशी आमिरची ओळख. एखाद्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कितीही प्रयोग करावे लागले तरी आमिरने मागे पुढे पाहिलं नाही. त्यामुळे प्रत्येक भूमिकेत समरस होऊन जाणारा अभिनेता अशी ओळख आमिरने रसिकांच्या मनात निर्माण केली आहे.
आमिरच्या दर्जेदार सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे 'कयामत से कयामत तक'. १९८८ साली रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'कयामत से कयामत तक' या सिनेमातून आमिर आणि जुही चावला झळकले होते. या सिनेमातील भूमिकेने या दोन्ही कलाकारांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. ही जोडी रसिकांच्या मनात घर करुन गेली.
या सिनेमाने त्यावेळी तिकीट खिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले. राज आणि रश्मीची लव्हस्टोरी, त्यातील प्रेमगीतं, कुटुंबीयांचा त्यांच्या लग्नाला होणारा विरोध आणि बहरणारी लव्हस्टोरी रसिकांना भावली होती. या सिनेमाने आमिर आणि जुहीलाही रातोरात स्टार बनवलं. आजही या सिनेमाची जादू काही कमी झालेली नाही.
‘इश्क’नंतर मात्र ही जोडी कधीच एकत्र दिसली नाही. याचे कारण म्हणजे, दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद. होय, जुही व आमिर हे दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. पण एक वेळ अशी आली की, आमिर व जुही दोघांनीही एकमेकांशी सहा-सात वर्षे अबोला धरला होता. आमिर नेहमीच सह कलाकारांची थट्टा मस्करी करण्याची सवय होती.
'इश्क' सिनेमाच्या सेटवर आमिरने जुहीची फिरकी घ्यायचे ठरवले. मला भविष्य कळते, असे म्हणून आमिरने जुहीचा हात पाहायचा म्हणून तिला हात पुढे करायला सांगितले. पण जुहीने जसा हात पुढे केला तसा आमिर तिच्या हातावर थुंकला. या प्रकारानंतर जुही इतकी संतापली होती की तिने आमिरसह बोलणे बंद केले होते. ‘इश्क’च्या शूटींग दरम्यान या वादाचा परिणाम होऊ दिला नाही.मात्र त्यानंतर एकत्रही झळकले नाहीत.