मुंबई : बॉलिवूडचे पंचम दा म्हणजेच संगीतकार आर.डी.बर्मन यांचा आजच्या दिवशी म्हणजेच 27 जून 1939 मध्ये कोलकातामध्ये जन्म झाला होता. त्यांचे वडील सचिन देव बर्मन हेही एक प्रसिद्ध संगीतकार होते. संगीताचं वातावरण असलेल्या घरातच पंचम दा यांचा जन्म झाल्याने अर्थातच त्यांनाही संगीताची आवड नसती तर नवलच. पण आर.डी. बर्मन यांना पंचम हे नाव कसं पडलं याचा एक गमतीदार किस्सा आहे.
कसे पडले पंचम हे नाव?
आर.डी.बर्मन यांना बालपणी टुबलू या नावाने हाक मारली जायची. पण नंतर त्यांना पंचम या नावाने बोलवू लागते. ते इंडस्ट्रीमध्ये पंचम नावाने लोकप्रिय झाले. झालं असं की, आर.डी.बर्मन हे जेव्हाही रात्री झोपायचे तेव्हा झोपेत त्यांच्या तोंडातून 'पा' असा आवाज यायचा. 'पा' हा सरगममधील पाचवी नोट आहे. त्यामुळे त्यांना पंचम हे नाव पडलं.
वयाच्या नवव्या वर्षी पहिलं गाणं केलं कंपोज
पंचम दा हे जेव्हा 9 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी पहिलं गाणं कंपोज केलं होतं. 'ऐ मेरी टोपी पलटके आ' असे त्या गाण्याचे बोल होते. हे गाणं त्यांच्या वडीलांनी एका सिनेमात वापरलं होतं. त्यानंतर पंचम दा यांनी 'सर जो तेरा चकराये' हे गाणं कंपोज केलं होतं. पंचम दा यांच्या वडिलांनी हे गाणं 'प्यारा' या सिनेमात वापरलं होतं. पण पंचम दा यांना या गाण्यासाठी क्रेडिट दिलं गेलं नाही.
इतक्या सिनेमांसाठी दिलं संगीत
संगीतकार म्हणून पहिल्यांदा 1957 मध्ये रिलीज झालेल्या 'राज' सिनेमासाठी संधी मिळाली. या सिनेमाचं दिग्दर्शन गुरु दत्त यांनी केलं होतं. पण हा सिनेमा कधीच रिलीज झाला नाही. त्यानंतर संगीतकार म्हणून त्यांना अनेक संधी मिळाल्या. त्यांनी जवळपास 300 सिनेमांसाठी गाणी कंपोज केलीत.