८०च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. 'कर्मा', 'मक्सद', 'जॉनी', 'तोफा', 'लाडला', 'मिस्टर इंडिया' अशा सुपरहिट सिनेमांत काम करून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनयाबरोबरच चर्चा होती ती श्रीदेवीच्या सौंदर्याची. केवळ चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या सौंदर्याने भुरळ पाडली होती. पण, २०१८ साली अचानक श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. यातून त्यांच्या कुटुंबीयांनाही सावरणं कठीण होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवीची लेक आणि अभिनेत्री जान्हवी कपूरने याबाबत भाष्य केलं.
जान्हवी आणि खुशी कपूरने नुकतीच करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ८' या शोमध्ये हजेरी लावली. 'कॉफी विथ करण'मध्ये जान्हवीने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिने श्रीदेवीच्या निधनाच्या धक्क्यातून कुटुंब कसं सावरलं याबाबतही भाष्य केलं. ती म्हणाली, "खुशी खूप धीट आहे. छोटी बहीण असूनही खुशीने आई गेल्यानंतर मला सांभाळलं." आईच्या आठवणीत जान्हवी आणि खुशी भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. पुढे ती म्हणाली, "जेव्हा मला आईच्या निधनाची बातमी समजली तेव्ही मी माझ्या रुममध्ये होते. मला खुशीच्या रुममधून रडण्याचा आवाज येत होता. मी तिच्या रुममध्ये जाऊन तिला पकडून रडेन, असं मला वाटलं होतं. पण, जेव्हा तिने मला पाहिलं. तिने तिचं रडणं थांबवलं. तेव्हापासून मी तिला रडताना पाहिलेलं नाही."
श्रीदेवीने १९९६ साली बोनी कपूर यांच्याशी विवाह केला होता. त्यांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत. आईच्या पावलावर पाऊल ठेवत जान्हवी आणि खुशीने अभिनयाची वाट धरली. करण जोहरच्या 'धडक' सिनेमातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'बवाल', 'गुंजन सक्सेना', 'मिली', 'गुडलक जेरी' अशा सिनेमांत जान्हवी झळकली. तर खुशीने अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनयातील करिअरला सुरुवात केली आहे.