उत्तम अभिनयासह आपल्या मस्तीखोर स्वभावामुळे कायम चर्चेत येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे काजोल. आजवरच्या कारकिर्दीत काजोलने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. अनेकदा काजोल (Kajol) काही रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र, यावेळी पहिल्यांदाच काजोल आणि तिची आई अभिनेत्री तनुजा 'कोण होणाप करोडपती' (kon honaar crorepati) या मराठी रिअॅलिटी शोच्या मंचावर हजेरी लावणार आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली काजोल आजही तिच्या आईला एका कारणामुळे घाबरते याचा खुलासा तिने केला आहे.
'कोण होणार करोडपती' हा रिअॅलिटी शो आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या पहिल्याच भागात विशेष अतिथी म्हणून काजोल आणि तनुजा सहभागी होणार आहेत. यावेळी काजोलने तिच्या आईविषयी अनेक खुलासे केले.
"लहानपणी मी खूप मस्तीखोर होते त्यामुळे मला अनेकदा आईचा मारही खावा लागला आहे", असं काजोल म्हणाली. तिचीची री ओढत तनुजा यांनीही काजोलची तक्रार केली. "कितीही मारा, काहीही करा ऐकायचीच नाही. ऐकून न ऐकल्यासारखं करायची", असं तनुजा म्हणाली. यावर काजोल "तुम्हाला घाबरायची का?" असा प्रश्न सचिन खेडेकर यांनी विचारला त्यावर तात्काळ "खूप घाबरायचे मी", असं उत्तर काजोलने दिलं. परंतु, "ही अजिबात घाबरत नव्हती", असं तनुजा म्हणाल्या.
दरम्यान, काजोलच्या हट्टी स्वभावामुळे तनुजा यांनी तिला पाचगणीच्या हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे या भागात काजोल आणि तनुजा अनेक भन्नाट किस्से सांगणार आहेत. पाचगणीच्या शाळेतील शिक्षण , काजोलची वाचनाची तर तनुजाची विविध भाषा शिकण्याची आवड , निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्याबरोबर काम करण्याचा तनुजा यांचा अनुभव , काजोलच्या डोळ्यांचा किस्सा , काजोलच्या नावाची गंमत अशा अनेक गोष्टींचा उलगडा 'कोण होणार करोडपती'च्या आजच्या विशेष भागात होणार आहे.