'कोण होणार करोडपती'च्या मंचावर येणार कऱ्हाडच्या स्वाती शिंदे, एक करोड रुपये जिंकण्याचे स्वप्न होणार पूर्ण ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:00 PM2021-08-03T15:00:50+5:302021-08-03T15:09:25+5:30
आता कऱ्हाडच्या स्वाती शिंदे हजेरी लावणार आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. ज्ञान तुम्हांला कधीही उपयोगी पडू शकतं आणि हीच तुमची खरी ताकद आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात.
महाराष्ट्राचा ‘भूतो न भविष्यती’ ओळखला जाणारा शो म्हणजे कोण होणार करोडपती. या शोला सुरुवात झाल्यापासून अल्पावधीतच या सिझनलाही रसिकांची पसंती मिळत आहे. सुरु झाल्यापासून अनेक नामांकित दिग्गजांनी शोमध्ये हजेरी लावत जिंकलेल्या रकमेतून सामाजिक कार्याला हातभार लावला आहे. 'कर्मवीर विशेष' पहिल्याच भागात पद्मश्री नाना पाटेकर यांनी हजेरी लावली होती.
नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगील युद्धात भागदेखील घेतला होता. त्यांनी आपले कारगील युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावुक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले.या भागाला रसिकांची भरघोस पसंती मिळाली होती.
कॅप्टन दिलीप दोंदे आणि अभिनेता जितेंद्र जोशी यांनी हजेरी लावली.हॉटसीटवर कॅप्टन दोंदे यांनी आपल्या सागर परिक्रमेचे अनेक रोमांचक किस्से सांगितले. जितेंद्रनेही आपली एक कविता या वेळी वाचून दाखवली! गप्पा, कविता, ज्ञान आणि समाजाला आपण काहीतरी देण्याची जाण, या सगळ्यांमुळे हा कर्मवीर विशेष भाग फार छान रंगला.
त्यानंतर मुंबईची मयूरी वावदाने हॉट सीटवर खेळायला आली होती. मयूरी एमबीबीएसची विद्यार्थिनी असून कर्जमुक्त करण्यासाठी तिने या शोमध्ये भाग घेतला होता.आदर्श गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनीही हा ज्ञानाचा खेळ खेळला. कर्मवीर विशेष भागामध्ये जिंकलेली सर्व रक्कम भास्करराव आपल्या गावातल्या रहिवाशांसाठी आणि गावाच्या विकासासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.
आता कऱ्हाडच्या स्वाती शिंदे हजेरी लावणार आहे. माणूस कोणत्याही मोठ्या संकटात सापडला, तरी त्याचं ज्ञानच त्याला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतं. ज्ञान तुम्हांला कधीही उपयोगी पडू शकतं आणि हीच तुमची खरी ताकद आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात याच ज्ञानाच्या साथीने स्पर्धक एक करोड रुपये जिंकू शकतात. या आठवड्यात स्वाती शिंदे हॉट सीटवर खेळायला येणार आहेत. स्वाती या फार्मासिस्ट असून त्यांचं स्वतःचं औषधांचं दुकान आहे. फार्मासिस्ट स्वाती शिंदे यांनी कोवीड परिस्थितीत आपलं कार्य कशा प्रकारे सुरू ठेवलं होतं, हे पटवून दिलं. सचिन खेडेकर हे उत्तम संचालक असून हॉट सीटवर असलेल्या सर्व स्पर्धकांना सांभाळून घेतात आणि त्यांना बोलतंही करतात.