मुंबई - करोडपती होण्याचं सामान्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. केबीसीच्या दहावा सीझन टीआरपीमध्ये सर्वात पुढे असून अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. मात्र आता या कार्यक्रमामुळे फसवणुकीचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. केबीसीच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन सुरू झालेल्या या फसवणुकी संदर्भात बिग बी अमिताभ बच्चन यांनीच आता पुढाकार घेऊन लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
केबीसी या कार्यक्रमात प्रामुख्याने बिग बी प्रश्न विचारतात आणि स्पर्धक त्या प्रश्नांची अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. मात्र या टेलीव्हिजन वरील या शो व्यतिरिक्त या कार्यक्रमाचं एक ऑनलाईन सेगमेंट आहे. त्याच्यामार्फत लोकांची फसवणूक केली जाते स्कॅमर डेटाबेसच्या माध्यमातून कोणालाही कॉल करून जाण्यात अडकवण्याचा प्रयत्न करतात. व्हॉईस कॉलच्या माध्यमातून जर लोक त्यांच्या जाळ्यात फसले नाहीत तर ते व्हॉट्सअॅपवर लोकांची केबीसीच्या नावाने फसवणूक करतात. त्यामुळेच अमिताभ यांनी केबीसीच्या नावाने येणाऱ्या फेक कॉल्सच्या जाळ्यात न अडकण्याचा सल्ला दिला आहे.
पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार केबीसीच्या नावाने येणारे फेक कॉल हे 0092 या क्रमांकानी सुरू होणारे आहेत. स्कॅमर कधी कधी केबीसीच्या टीमचा सदस्य असल्याचं सांगून लोकांना सोपा प्रश्न विचारतात. त्यानंतर तुम्ही 25 ते 30 लाखांची रक्कम जिंकला आहात. मात्र त्यासाठी तुम्हाला 8000 ते 10,000 रुपये जमा करावे लागतील असं खोटं सांगतात. ते पैसे बँकेत जमा करण्यास सांगितलं जातं. लोकही त्यांच्या जाळ्यात अडकून पैसे ट्रान्सफर करतात आणि फसतात.