रेनरोज फिल्म्सची निर्मिती असलेल्या 'कृतांत' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
'कृतांत'चा टीझर रिलीज झाल्यानंतर चहूबाजूंनी आपल्यावर अभिनंदनाचा वर्षाव झालाच पण त्यासोबतच या चित्रपटात नेमके काय पाहायला मिळेल याबाबतही विचारणा झाल्याचे सांगत संदिप कुलकर्णी म्हणाले की, आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. केवळ गेटअपच्या बाबतीतच नव्हे तर विचारसरणीच्या पातळीवरही मानवतेचे दर्शन घडवणारी आहे. या चित्रपटातील माझा गेटअप काहीसा वेगळा असला तरी कथानक मात्र आजच्या काळातील आहे. आजचे जीवन आणि जगण्याचे तत्त्वज्ञान यांचे अचूक समीकरण या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. दिग्दर्शक दत्ता भंडारे यांनीच 'कृतांत' या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखनही केले आहे. या चित्रपटाचे लेखनही स्वत:च केलेले असल्याने कागदावर लिहिलेले पडद्यावर उतरवताना कुठेही तफावत झाली नसल्याचे भंडारे म्हणाले. ते म्हणाले की, कथा लिहिताना जो विषय माझ्या मनात होता तोच अगदी नेमकेपणाने पडद्यावरही उतरवता आल्याचं समाधान मिळालं. निसर्ग आणि मानवता यातील नाते अधोरेखित करणारं हे कथानक प्रत्येकाला काही ना काही संदेश देणारं आहे. चित्रपटाच्या कथानकाबाबत इतक्यात काही सांगणे उचित ठरणार नाही. ट्रेलर पाहिल्यावर 'कृतांत'मध्ये काय पाहायला मिळेल याचे संक्षिप्त उत्तर नक्कीच मिळेल असेही भंडारे म्हणाले.
संदिप कुलकर्णी यांच्या जोडीला सुयोग गोऱ्हे, विद्या करंजीकर, सायली पाटील आणि वैष्णवी पटवर्धन यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. शरद मिश्रा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. विजय मिश्रा यांच्या नजरेतून 'कृतांत'चा विषय आणि त्या ओघाने येणारं निसर्गसौंदर्य प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील गीतांना संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिलं आहे. दत्ताराम लोंढे यांनी या चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी चोख बजावली आहे.