‘कृष्णा चली लंडन’ ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या राधे आणि कृष्णाचा लंडनमध्ये मुक्काम आहे. मालिकेचे कथानक वास्तववादी होण्यासाठी निर्मात्यांनी लंडनमधील काही प्रसिध्द स्थळांवर जाऊन मालिकेचे चित्रीकरण केले आहे.
यासंदर्भात मालिकेचे निर्माते सौरभ तिवारी म्हणाले, “लंडनमधील सर्व प्रमुख स्थळांवर जाऊन आम्ही तब्बल 14 दिवस मालिकेचं चित्रीकरण केलं होतं. ऑक्सफर्ड विद्यापिठामध्येही चित्रीकरण केलं. हे चित्रीकरण आम्ही नैसर्गिक प्रकाशात केल्यामुळे त्यात लंडनचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. ख्रिस्तमसमध्ये आम्ही लंडनमध्ये चित्रीकरण केल्यामुळे तिथल्या वातावरणात एक वेगळाच उत्सह होता. अनेक इमारती, दुकानं वगैरेंवर रोषणाई आणि सजावट केलेली होती. प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन चित्रीकरण करण्यास परवानगी मिळण्यास आम्हाला काहीच अडचण आली नाही, कारण त्याबाबतीत त्या शहराचं धोरण खूपच अनुकूल आहे. फक्त सध्या दिवस फारच लहान असल्याने दिवसाउजेडी चित्रीकरण करण्यास आम्हाला फारच कमी वेळ मिळत होता, हीच मुख्य अडचण होती. त्यामुळे आम्हाला केवळ पाच-सहा तासांत चित्रीकरण आटोपून घ्यावं लागत होतं. तरीही हा एक फारच उत्तम अनुभव होता आणि लंडनच्या पार्श्वभूमीमुळे मालिकेला चांगलाच उठाव मिळाला.”
राधे हा कानपूरमध्ये राहणारा २१ वर्षांचा देखणा तरुण असून त्याच्या वयाच्या अन्य मुलांची स्वप्ने लक्षावधी रुपये कमावणे, चांगल्या कंपनीत नोकरी करणे किंवा मित्रांबरोबर पार्टी करणे अशी असतात. पण राधेचे स्वप्न या वयातील इतर मुलांपेक्षा खूपच वेगळे आहे. या मालिकेची कथा ही आजच्या इतर मालिकांपेक्षा वेगळी असल्याने ती प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे.