‘ग्रीक गॉड’ म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan ) याचे जगभर चाहते आहेत. तरूणी तर त्याच्यावर फिदा आहेत. पण याच हृतिकचा ताजा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. होय, कमाल आर. खान अर्थात केआरकेने हृतिकचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हृतिक रोशनला ‘टक्कल’ पडलेलं दिसतंय. यावरून केआरकेने हृतिकची खिल्ली उडवली आहे. हृतिकचा हा व्हिडिओ मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे आणि मेकअप आर्टिस्ट विजय पालांडे यांच्या साखरपुड्याचा आहे. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत या साखरपुड्याला आला होता. व्हिडीओत हृतिक रोशन विजय पालांडे आणि भाग्यश्री मोटे यांना यांना शुभेच्छा देताना दिसतोय आणि यात त्याच्या मागच्या बाजूला डोक्यावर ‘टक्कल’ पडलेलं दिसतंय.
केआरकेने हृतिकचा हा व्हिडीओ शेअर करत त्याची मजा घेतली आहे. ‘जेव्हा हृतिक रोशन हेअर पॅच घालायला विसरतो...,’ असं कॅप्शन देत त्याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर याच व्हिडीओची चर्चा आहे. काहीजण हा व्हिडीओ पाहून हृतिकची खिल्ली उडवली आहे तर काहींनी त्याचा बचाव करत केआरकेला फैलावर घेतलं आहे. ‘त्याचं टक्कल असलं तरी तो हँडसम दिसतो, तू तुझं बघ,’ अशा शब्दांत एका युजरने केआरकेला फटकारलं आहे. ‘ब्रेन सर्जरीमुळे हृतिकला हे झालंय. तुझ्या सारख्या लोकांना ते विचित्र वाटू शकतं,’ असं लिहित एकाने केआरकेची शाळा घेतली.
सुपरस्टार हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर नुकताच त्याच्या ‘विक्रम वेधा’ हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटात सैफ अली खानही मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटानंतर हृतिक रोशन त्याच्या पुढच्या चित्रपटात व्यस्त झाला आहे. तो लवकरच दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या ‘फायटर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण हृतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.