कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) हा गोविंदाचा (Govinda) भाचा आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र मामा भाचाची या जोडीत बरेट खटके उडाले होते. दोघंही एकमेकांशी अजिबातच बोलत नव्हते. याचेही बरेच किस्से आपण ऐकले आहेत. आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्यातलं भांडण मिटलं आहे. नुकतंच कृष्णा मामाला भेटायला त्याच्या घरी गेला होता. तब्बल ७ वर्षांनंतर तो गोविंदाच्या घरी गेला.
काही दिवसांपूर्वीच मिसफायर झाल्याने गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. तेव्हा कृष्णा शूटसाठी ऑस्ट्रेलियात होता त्यामुळे मामाला भेटू शकला नाही. तरी त्याची पत्नी कश्मिरा रुग्णालयात आली होती. आता नुकतंच तब्बल ७ वर्षांनंतर गोविंदाच्या घरी जात त्याने मामाची भेट घेतली. कृष्णा म्हणाला, "भारतात आल्यानंतर मी लगेच चीची मामाच्या घरी गेलो. ७ वर्षांनंतर पहिल्यांदाच मी तिकडे गेलो. असं वाटलं अर्धा वनवास पूर्ण झाला. आता मामा बरा होत आहे. मी त्यांच्याकडे जवळपास १ तास होतो. इतक्या वर्षांनंतर मी नम्मोला म्हणजे टीनालाही भेटलो. हा खूपच भावनिक क्षण होता. मी तिला मिठी मारली. झालेल्या गोष्टींचा उल्लेखही निघाला नाही याचा मला आनंद आहे."
तो पुढे म्हणाला, "आम्ही खूप गप्पा मारल्या, हसलो आणि जुन्या आठवणी ताज्या केल्या. अगदी पहिल्यासारखंच वाटलं. ती सगळी वर्ष जी मी मामा-मामीसोबत त्यांच्या घरी घालवली ती माझ्या डोळ्यासमोर फिरत होती. मी मामा म्हटलं की हॉलचा तर कायापालट झाला आहे. आता सगळी भांडणं मिटली आहेत. भांडणांचा उल्लेखही आसा नाही आणि कुटुंब असंच असलं पाहिजे. गैरसमज होतात पण कोणतीच गोष्ट आपल्याला जास्त काळ दूर ठेवू शकत नाही. मी मामीला भेटू शकलो नाही कारण ती व्यस्त होती. पण खरं सांगायचं तर मी तिच्यासमोर जायला घाबरतच होतो. मला माहित होतं ती मला ओरडेल. पण नकळत चूक झाली असेल तर मोठ्यांचा ओरडा खायलाही तयार राहायला पाहिजे."