अक्षय कुमार सध्या प्रचंड बिझी आहे. एक चित्रपट हातावेगळा केली की, दुसरा तयार, अशी त्याची अवस्था आहे. नुकताच त्याचा ‘हाऊसफुल 4’ प्रदर्शित झाला आणि लगेच अक्षय ‘गुड न्यूज’मध्ये बिझी झाला. विशेष म्हणजे, ‘गुड न्यूज’ रिलीज होण्याआधी त्याच्या ‘बेल बॉटम’ या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. पण तूर्तास त्याचा हा आगामी सिनेमा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.होय, ‘बेल बॉटम’चा फर्स्ट लूक रिलीज होताच हा सिनेमा वादात सापडला आहे. याचे कारण म्हणजे, याच वर्षाच्या सुरुवातीला याच नावाने एक कन्नड सिनेमा रिलीज झाला होता.
‘बेल बॉटम’ हा याच कन्नड सिनेमाचा रिमेक आहे, असे लोकांना वाटत असताना अक्षयने मात्र याचा इन्कार केला आहे. कन्नड चित्रपटाचे संपूर्ण हक्क कन्नड दिग्दर्शक व स्टंट कोरिओग्राफर रवी वर्मा यांच्याकडे आहे. साहजिकच अक्षयच्या ‘बेल बॉटम’ची घोषणा होताच, रवी वर्मा यांची नाराजी समोर आली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा विचार रवी वर्मा यांनी चालवला आहे.
ई टाईम्सशी बोलताना रवी वर्मा यांनी आपला हा इरादा बोलून दाखवला. आम्ही अद्याप कुणालाही कायदेशीर नोटीस पाठवलेली नाही. पण कन्नड सिनेमा आणि हिंदी सिनेमा ‘बेल बॉटम’ यांच्यात कुठलेही साम्य असता कामा नये. ‘बेल बॉटम’रिलीज झाल्या नंतर मी मुंबईच्या अनेक प्रॉडक्शन हाऊसशी याचे हक्क विकण्यासंदर्भात संपर्क साधला होता. माझ्या मते, आमच्या कन्नड चित्रपटाचीच कथा व स्टाईल कॉपी केली गेली आहे. अक्षय यासंदर्भात माझ्याशी बोलणार आहे. शीर्षकच नाही तर पोस्टरही कन्नड चित्रपटाशी मिळतेजुळते आहे. सध्या तरी अक्षयच्या फिल्मच्या मेकर्सला हे टायटल कसे मिळाले, हा प्रश्न मला पडला आहे, असे वर्मा म्हणाले.‘बेल बॉटम’ या आगामी सिनेमात अक्षय कुमार एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. रंजीत एम तिवारी हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. 2021 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.