‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मलिकेत कुल्फीची भूमिका रंगविणारी बालकलाकार आकृती शर्मा हिची सध्या चित्रीकरण आणि शाळेतील परीक्षेचे वेळापत्रक सांभाळताना मोठी ओढाताण सुरू आहे.
आकृती शर्मा ही सात वर्षांची चिमुरडी दररोज सकाळी सात वाजता सेटवर आठ तासांच्या चित्रीकरणासाठी हजर असते आणि तिच्या चेहऱ्यावर लाघवी हास्य कायम असते. मात्र तिच्या डोक्यात परीक्षेचे वेळापत्रक आणि अभ्यासाचे विषय यांचा ताण असतो. मात्र ती प्रत्येक प्रसंग नेहमीप्रमाणेच मनमोकळ्या पद्धतीने साकारत असते. आकृती शर्मा ही उत्कृष्ट अभिनेत्रीच आहे, असे नव्हे, तर ती कठोर परिश्रम घेणारी विद्यार्थिनीही आहे. चित्रीकरणाच्या ब्रेकमध्ये तिच्या हातात अभ्यासाचे पुस्तक असते.
इतकेच नव्हे, तर मालिकेत तिच्या वडिलांची भूमिका रंगविणारा अभिनेता विशाल आदित्य सिंह हा सुद्धा चित्रीकरणाच्या दरम्यान तिची शिकवणी घेत असतो. एखादा बाप आपल्या मुलीला जसे शिकवेल, तसेच तो तिला शिकविताना दिसतो. यासंदर्भात आकृती सांगते, “विशालभय्या हे फारच छान शिक्षक आहेत. ते मला जे शिकवितात, ते सर्व मला समजतं. ते माझ्या सर्व शंका दूर करतात आणि मी एखादा प्रश्न त्यांना पुन्हा पुन्हा विचारला, तरी ते माझ्यावर रागावीत नाहीत. मी चांगला अभ्यास करीत आहे, असं ते माझ्या आईला सांगतात.”
आपण जे काही काम करतो, त्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत, अशी आकृतीची समजूत आहे. त्यामुळेच अभिनय असो की अभ्यास, ते करताना त्यात ती सर्वस्व झोकून देते. एखादी इतकी लहान मुलगी आपल्या अभ्यास आणि कामाविषयी इतकी कटिबद्ध असल्याचे पाहणे हे निश्चितच प्रेरणादायक आहे, नाही का?
कुल्फी कुमार बाजेवाला ही मालिका स्टार प्लसवर प्रक्षेपित होत असून मोहित मलिक, अंजली मलिक, आकृती शर्मा यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले असले तरी या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत.