९०च्या दशकात गायक कुमार सानू यांनी आपल्या एकापेक्षा एक सुपरहिट गाण्यांनी धमाका उडवून दिला होता. प्रत्येकजण त्यांचीच गाणी गात होता. अनेकांच्या न दिसणाऱ्या जखमांवर आपल्या आवाजाने फुंकर घालणाऱ्या याच कुमार सानू यांचा आज वाढदिवस. २० ऑक्टोबर १९५७ ला त्यांचा जन्म कोलकातामध्ये झाला होता. आपल्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे कुमार सानू यांच्यासाठी गायक बननं सोपं नव्हतं. या प्रवासात त्यांना वडिलांकडून मारही खावा लागला होता.
द कपिल शर्मा शोमध्ये कुमार सानू यांनी खुलासा केला होता की, त्यांनी त्यांचं पहिलं लाइव्ह परफॉर्मन्स माफिया गॅंगसमोर दिलं होतं. ते म्हणाले होते की, 'मी माझं पहिलं लाइव्ह परफॉर्मन्स माफिया गॅंगसमोर रेल्वे ट्रॅकवर दिलं होतं. मला काही हिंदी गाणी गाण्यास सांगण्यात आले होते. त्यावेळी तिथे जवळपास २० हजार लोक होते. मी त्यांच्यासमोर घाबरत घाबरत गाणी गायली. मी फार नशीबवान होतो की, त्यांना माझी गाणी आवडली'.
कुमार सानू यांनी पुढे सांगितले की, जेव्हा या परफॉर्मन्सबाबत त्यांच्या वडिलांना समजलं तेव्हा ते फार रागावले होते आणि त्यांनी चांगलाच मार दिला होता. ते म्हणाले की, त्यांचे वडील रूढीवादी परिवारातील आहेत आणि जेव्हा त्यांना समजलं की, मुलाने माफिया गॅंगसमोर गाणं गायलं तर त्यांनी माझ्या कानाशिलात लगावली होती.
दरम्यान, कुमार सानू यांनी त्यांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. त्यांनी संगीतकार जोडी नदीम-श्रवणसोबत महेश भट्ट यांच्या 'आशिकी'साठी गाणी गायली होती. ही गाणी सुपरहिट ठरली. आजही ही गाणी तेवढीच लोकप्रिय आहेत. यानंतर कुमार सानू यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.