Join us

‘दिल है हिंदुस्तानी-2'च्या मंचावर कुमार सानू यांनी सौम्याला भेट दिली हार्मोनियम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 1:24 PM

‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ या कार्यक्रमात नामवंत पार्श्वगायक कुमार सानू हे अलीकडेच सहभागी झाले होते.

ठळक मुद्देकुमार सानू सौम्याचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध झालेकुमार सानू यांनी एक हार्मोनियम भेट म्हणून दिली

‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ या कार्यक्रमात नामवंत पार्श्वगायक कुमार सानू हे अलीकडेच सहभागी झाले होते. या भागात 12 वर्षांच्या सौम्याबरोबर ‘आँखों की गुस्ताखिया’ हे गाणे गात असलेला कुमार सानू तिचा आवाज ऐकून मंत्रमुग्ध झाले.  तिच्या आवाजाची जादू आणि आविष्कार पाहून परीक्षकांपैकी प्रीतमने व्यासपिठावर धाव घेऊन तिला आलिंगन दिले. यानंतर तिला कुमार सानू यांनी एक हार्मोनियम भेट म्हणून दिली.

कुमार सानू म्हणाले, “मी आजवर अनेक कलाकारांबरोबर कामं केली आहेत, गाणी गायली आहेत. पण या वयात सौम्याचा आवाज हा कमाल आहे. तिने काही गाणी इतक्या उत्कृष्ट पध्दतीने गायली आहेत की तशी ती कसलेल्या गायिकांनाही गाता आली नसती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतके अप्रतिम आहेत की काही काळ मी त्यातच हरवून गेलो होतो. हार्मोनियम हा भारतीय संगीताचा प्राण आहे. सौम्याने आपल्यावर सोपविलेली गाण्याची जबाबदारी आपल्या आवाजाने आणि सुंदर भावनाविष्काराने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. तिला इतका आनंद झाला होता की तिच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. मला तिच्यासोबत गाणं गाता आलं, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि ती पार्श्वगायन कधी करते आहे, त्याकडे माझं लक्ष लागून राहिलं आहे.” ‘दिल है हिंदुस्तानी-2’ हा भारतीय संगीताच्या प्रेमामुळे देशांच्या सरहद्दी पुसून टाकणारा आणि हिंदुस्तानी संगीतावर प्रेम करणाऱ्या जगभरातील संगीतप्रेमींना एकत्र आणणारा रिअ‍ॅलिटी कार्यक्रम आहे. भारतीय संगीताचा प्रभाव अधोरेखित करणारा आणि जगभरातील स्पर्धकांकडून लोकप्रिय भारतीय संगीताला नवा आयाम देणाऱ्या या कार्यक्रमात जगभरातील हिंदुस्तानींचं एक संमेलनच भरलेलं असतं. या कार्यक्रमात जगभरातील गुणी गायक आणि संगीतकार लोकप्रिय भारतीय गाणी गातील. पण ती गाणी ते स्वत:च्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत गातात.

टॅग्स :कुमार सानू