'कुंडली भाग्य' ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. पण, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री श्रद्धा आर्याने मालिकेतून एक्झिट घेतली आहे. श्रद्धा आर्या गरोदर असल्याने तिने ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. पण, श्रद्धा आर्यानंतर आणखी एका अभिनेत्याने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता पारस कलनावतने कुंडली भाग्य मालिकेतून एक्झिट घेतली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत त्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. "प्रत्येक सुरुवातीचा एक शेवट असतो आणि प्रत्येक शेवटाची एक नवी सुरुवात होते. अलविदा म्हणणं सोपं नाही. पण, मी त्या मालिकेला अलविदा म्हणत आहे जी माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळ आहे. आणि या मालिकेने माझ्या आयुष्यात जादूसारखं काम केलं आहे", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
श्रद्धा आर्या आणि पारसआधी मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री सना सैय्यदनेदेखील 'कुंडली भाग्य' मालिकेतून एक्झिट घेतली होती. एकामागोमाग एक कलाकारांच्या एक्झिटनंतर आता ही मालिकाही बंद होणार आहे. २०१७ साली या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. आता ८ वर्षांनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ६ डिसेंबरला 'कुंडली भाग्य'चा शेवटचा भाग प्रसारित केला जाणार आहे.