मराठीतील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकार कुशल बद्रिके (Kushal Badrike) आता हिंदीचं स्टेज गाजवण्यास सज्ज आहे. 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमामुळे कुशलला ओळख मिळाली. त्याच्या विनोदांच्या अचूक टायमिंगवर सगळेच खळखळून हसतात. कुशलकडे हसवण्याची नामी कला आहे. आता कुशल एका हिंदी चॅनेलवरील विनोदी कार्यक्रमात झळकणार आहे. त्याने नुकताच प्रोमोही शेअर केला. यावर चाहत्याने त्याला 'चला हवा येऊ द्या'चं काय असा प्रश्न विचारला. यावर कुशल काय म्हणाला बघा.
सोनी टीव्हीवर 'मॅडनेस मचाएंगे' हा विनोदी कार्यक्रम सुरु होतोय. 'बिग बॉस 17' चा विजेता मुनव्वर फारुकी आणि अभिनेत्री हुमा कुरेशी या शोमध्ये परिक्षक आहेत. अनेक विनोदवीर यामध्ये हसवताना दिसणार आहेत. त्यातच आपला मराठमोळा कुशल आहे. कुशल हिंदी शोमध्ये आला म्हणल्यावर 'चला हवा येऊ द्या' मध्ये असणार की नाही असा प्रश्न चाहत्याने विचारला. यावर कुशलने 'असणार' अशी प्रतिक्रिया दिली. कुशलच्या प्रतिक्रियेनंतर चला हवा येऊ द्या च्या प्रेक्षकांनी नि:श्वास सोडला.
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमाला नुकतेच १० वर्ष पूर्ण झाली आहेत. डॉ निलेश साबळेंनी काही दिवसांपूर्वीच कार्यक्रम सोडला. तर कुशलने दोन दिवसांपूर्वी झी मराठीचे आभार मानणारी पोस्ट केली होती. त्यामुळे कुशलनेही चला हवा येऊ द्या ला रामराम केला का असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र यावरुन आता पडदा उठला आहे. कुशल अजूनही चला हवा येऊ द्या चा भाग आहे. नुकतीच श्रेया बुगडेने १० वर्ष झाल्यानिमित्त टीमसोबत फोटो शेअर केला. यामध्ये प्रेक्षकांनी सागर कारंडे आणि निलेश साबळेंची आठवण काढली. त्यांना फोटोत का घेतले नाही असाही प्रश्न विचारला.