छोट्या पडद्यावरील 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधील लोकप्रिय अभिनेता, विनोदवीर म्हणजे कुशल बद्रिके (kushal badrike). मनोरंजन विश्वात सक्रीय असलेला कुशल सोशल मीडियावरही सक्रीय आहे आणि तो या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. कुशलच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत असते. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने चौहान नामक पानवाल्याचा उल्लेख केला आहे.
कुशल बद्रिकेने इंस्टाग्रामवर एअरपोर्टवरील फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, मी लहान असताना माझ्या वडिलांना पान खायची भारी हौस होती. 120/300 कत्री सुपारी पंढरपुरी तंबाखू मारके. आणि त्या पानाचे पैसे, मला माझ्या हातून द्यायची भारी हौस. लहानपणी एकदा, असंच पप्पांच्या पानाचे पैसे “मी” देत असताना त्या चौहान नावाच्या पानवाल्याने माझा हात पाहिला आणि म्हणाला…..“साब ये लडका बडा होके कुछ बनेगा, देखो ये ना… देस बिदेस घुमेगा !
लहानपणी, कन्नी कापलेल्या पतंगा मागे “उरफाटेस्तोवर” धावणाऱ्या मला, माझ्या आई-वडिलांनी कधी स्वप्नांच्यामागे “उरफाटेस्तोवर” धावायला लावलं नाही, आणि झाडाला “व्हलटा” (छोटी काठी) मारून हवी असलेली “कैरी” पदरात पाडून घेणाऱ्या माझ्यातही, हवी असलेली “स्वप्न“ पदरात पाडून घेण्याचं स्किल कधी आलं नाही.जे जसं होत गेलं, तसा मी घडत गेलो, घरातून “प्रामाणिकपणाची शिदोरी” तेवढी मिळाली होती ती मात्र ह्या प्रवासात कामी आली. आणि अजूनही येत असल्याचे त्याने म्हटले.पुढे त्याने लिहिले की, माझ्या आई-बाबांनी, अवास्तव स्वप्न पाहून स्वतःच्या पापण्या कधी जड करुन घेतल्या नाहीत, की अपेक्षांचं ओझं माझ्या खांद्यावर टाकून, माझ्या आयुष्याला कुबड आणलं नाही, म्हणून मी आता पानवाल्या चौहान साबचं बोलणं खरं करायला निघालोय. आज पुन्हा मी लंडन च्या प्रवासाला निघालोय…..नशीबाच्या पानावर माझ्यासाठी काय लिहून ठेवलय मला माहित नाही, पण त्यादिवशी चौहान साबने पप्पांच्या १२०/३०० पानावर माझा हा लंडन दौरा लिहिला असेल हे नक्की. - सुकून