टीव्हीचा लोकप्रिय चेहरा कुशल पंजाबीने अवघ्या वयाच्या 37 व्या वर्षी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. कुशलने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीतील स्टार्स आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कुशलच्या अंत्यदर्शनाला छोट्या पडद्यावरील त्याच्या अनेक मित्रमैत्रिणींनी हजेरी लावली. त्याच्या मित्रमैत्रिणींना यावेळी अश्रू आवरत नव्हते.
कुशलच्या अंत्यदर्शनाला चेतन हंसराज, करणवीर बोहरा, दृष्टी धामी, जसवीर कौर, अर्जुन बिजलानी, बख्त्यार इराणी, तनाझ इराणी, डेलनाझ इराणी, करण व्ही ग्रोव्हर, एजाज खान, नंदिश संधू यांसारखे अनेक कुशलचे मित्रमैत्रीण उपस्थित होते. कुशलच्या निधनाचा त्याच्या मित्रमैत्रिणींना चांगलाच धक्का बसला आहे.
कुशलचे आईवडील त्याच्या निधनाच्या आदल्या दिवशी आपल्या मुलाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. पण कुशलचा फोन बंद येत होता. रात्र झाली तरी कुशलशी संपर्क होत नव्हता. कुशलचे आईवडील रात्री 10.30 वाजता तो राहत असलेल्या बिल्डींगमध्ये पोहोचले. त्यावेळी तो घरात एकटा होता.
दरवाज्याची बेल वाजवल्यावरही तो प्रतिसाद देत नसल्याने आईवडिलांनी दरवाजा तोडला असता आत कुशलचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. कुशलने सुसाईड नोटमध्ये आत्महत्या करत असल्याचे नमूद केले असून या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये, असेही त्याने यात लिहिले आहे.
कुशलने नोव्हेंबर 2015 मध्ये युरोपियन गर्लफ्रेन्ड Audrey Dolhen हिच्यासोबत लग्न केले. दोघांना एक मुलगा आहे. कुशल मुलावर प्रचंड प्रेम करायचा. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर केला होता. इन्स्टा स्टोरीवर त्याने मुलाचा फोटो शेअर करत सोबत हार्ट शेप इमोजी पोस्ट केला होता. ही त्याची अखेरची पोस्ट होती.