सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक 'ऑस्कर २०२५' (Oscars २०२५) साठी भारताकडून किरण राव (Kiran Rao) दिग्दर्शित 'लापता लेडीज' सिनेमाची निवड करण्यात आली आहे. लापता लेडीज' १ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. लापता लेडीजने इतर सर्व सिनेमांना मागे टाकत ऑस्करसाठी एन्ट्री मिळवली आहे. जगात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर २०२५ मध्ये नामांकन मिळाल्याने सिनेमाची संपूर्ण टीम खूश झाली आहे. अशातच सिनेमात 'मंजू माई'च्या भूमिकेत भाव खाऊन गेलेल्या मराठमोळ्या छाया कदम (Chhaya Kadam) यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
'लापता लेडीज' सिनेमाची भारताकडून ऑक्सरमध्ये एन्ट्री झाल्यावर छाया कदम यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट करत आनंद व्यक्त केलाय. छाया कदम यांनी 'लापता लेडीज' सिनेमात 'मंजू माई'ची भूमिका साकारली होती. त्यांच्या पात्राचं खूप कौतुकही झालं होतं. आता छाया कदम यांनी सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत त्या व्हॅनिटी व्हॅनसमोर उभ्या असल्याचं पाहायला मिळतेय. व्हॅनिटी व्हॅनवर त्यांच्यापात्र 'मंजू माई' नावाची पाटी दिसतेय. त्या पाटीकडे छाया कदम कौतुकानं पाहत असल्याचं या फोटो पाहायला मिळतेय.
छाया कदम यांनी फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, "आणि तुमची मंजू माई 'ऑस्कर'पर्यंत पोहचली. अभिनय क्षेत्रातल्या प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते की, आपली कला ऑस्करपर्यंत पोहचावी. पण त्यासाठी त्या कलाकाराच्या वाट्याला तसे पात्र ही यावे लागते. आणि मला आनंद आहे की, माझ्या वाट्याला लापता लेडीजच्या माध्यमातून मंजू माई हे पात्र आले. आणि आज तुम्हा सर्वांच्या प्रेमाने तुमची मंजू माई ऑस्करपर्यंत पोहचली. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या आणि मंजू माई सोबत राहो", या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात.
छाया कदम यांना आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून त्यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अलिकडेच छाया कदम यांचा All We Imagine Is Light हा सिनेमा जगात मानाच्या समजल्या जाणाऱ्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये गाजलाय. काही महिन्यांपूर्वी ‘All We Imagine As Light’ या सिनेमाचा कान्स महोत्सवात प्रिमियर झाला. यावेळी सिनेमा संपल्यावर उपस्थित परदेशी प्रेक्षकांनी आणि थिएटरमधील सर्वांनी या सिनेमासाठी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. याक्षणी कॅमेरा जेव्हा छाया कदम यांच्यावर आला तेव्हा त्या या कौतुकाने भारावलेल्या दिसल्या होत्या. छाया कदम यांची आतापर्यंतची प्रत्येक भूमिका वेगळी आहे आणि सर्वच भूमिकांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.