‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला जात आहे. अज्या आणि शीतल यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य करत आहेत.
या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री हि कमाल आहे आणि म्हणूनच अजिंक्य आणि शीतल यांची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या मनाला भिडते. कितीही घाई असली तरी कुठलाही सिन करण्याआधी नितीश आणि शिवानी बसून वाचन करतात आणि त्याचा सराव करतात. मालिकेच्या चित्रीकरणातील एक अविस्मरणीय क्षण सांगताना शिवानी म्हणाली, "अज्याची जेव्हा पहिल्यांदा सीमेवर पोस्टिंग होते, तेव्हा तो जाईपर्यंत शीतलला रडू येत नाही. पण तो गेल्यानंतर मात्र तिला रडू कोसळत आणि इतकंच नव्हे तर अजिंक्यला देखील रडायला येतं. हा सिन शूट करताना आम्हाला ग्लिसरीनची गरज भासली नाही. आम्ही दोघेही खरंखरं रडत होतो. प्रत्येक वेळी अज्या जाताना जवानाचं आयुष्य डोळ्यसमोर उभं राहतं. आपल्या कुटुंबाला सोडून जाताना त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काय त्रास होत असेल याची जाणीव होते."