राजकारणाचा आखाडा गाजवणारे राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यादव सध्या जिममध्ये घाम गाळत आहेत. होय, पाटण्याच्या एका जिममध्ये रोज भल्या पहाटे पोहोचणाऱ्यांमध्ये तेजप्रताप पहिले असतात. आता यामागे केवळ फिट राहणे, हाच तेजप्रसाद यांचा उद्देश असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात. होय, कारण तेजप्रताप यांचा उद्देश काही वेगळाच आहे. तेजप्रताप अभिनेता बनण्याच्या तयारीत आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आपल्या याच ग्रँण्ड डेब्यूसाठी अलीकडे ते तासन तास जिममध्ये असतात.
अलीकडे त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर स्वत:च्या आगामी चित्रपटाचे पोस्टर पोस्ट केले होते. ‘रुद्रा द अवतार’ असे त्याच्या चित्रपटाचे नाव आहे. या पोस्टरवर तेजप्रताप डॅशिंग अवतारात दिसतं आहेत. नेमक्या याच चित्रपटासाठी तेजप्रताप जिममध्ये घाम गाळत आहेत.
त्यांच्या सोशल अकाऊंटवर म्हणूनच रोज नवा वर्कआऊट व्हिडिओ पोस्ट होतोय. तूर्तास या चित्रपटाबद्दल अधिक माहिती मिळू शकलेली नाही. पण तेजप्रताप यांनी सांगितल्यानुसार, चित्रपटाची कथा बिहारची आहे आणि बिहारमध्येच त्याचे शूटींग होणार आहे.