मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकणारी भारताची हरनाज संधू ( Miss Universe Harnaaz Sandhu ) सध्या ट्रेंडमध्ये आहे. तिच्या जबरदस्त फोटोंपासून ते दमदार उत्तरांपर्यंत अनेक व्हिडिओ सोशल व्हायरल झालेत. स्टेजवर मांजरीचा आवाज काढतानाचा हरनाजचा व्हिडीओ तर तुफान व्हायरल झाला होता. होय,‘मिस युनिव्हर्स 2021’ स्पर्धेदरम्यान होस्ट स्टीव्ह हार्वे (Steve Harvey) याने हरनाजला स्टेजवर मांजरीचा आवाज काढण्यास सांगितलं होतं. स्टीव्हच्या या गोष्टीचं त्यावेळी हरनाजलाही आश्चर्य वाटलं होतं.
‘ओ गॉड स्टीव्ह, मी मिस युनिव्हर्सच्या मंचावर असं काही करेन असं वाटलं नव्हतं. पण आता मला हे करावं लागेल. माझ्याकडे दुसरा पर्याय देखील नाही,’ असं म्हणत तिने मांजरीचा म्याव...म्याव... आवाज काढला होता.
याची ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती आणि यावरून नेटकऱ्यांनी स्टीव्हला नको ते ऐकवलं होतं. स्टीव्हला लोकांनी अतिशय वाईट पद्धतीनं ट्रोल केलं होतं. आता यावर माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ता (Lara Dutta) हिनं मोठा खुलासा केला आहे.
म्हणून हरनाजला मांजरीचा आवाज काढायला सांगितला गेला...‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत लारा दत्ता म्हणाली, ब्युटी पेजेंटच्या शर्यतीत उतरण्यापूर्वी प्रत्येक स्पर्धकाला 15 पानांचा questionnaire दिला जातो. यात स्पर्धकाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. मला सुद्धा असेच प्रश्न विचारले गेले होते. मी भरतनाट्यम आणि कथ्थक शिकलेय, असं मी यात लिहिलं होतं. त्यामुळे प्रत्यक्ष स्पर्धेत स्टेजवर मला या डान्सच्या काही स्टेप्स करायला सांगितलं गेलं होतं. माझ्या गाऊनमुळे मी डान्स करू शकत नव्हते. तो त्या कलेचा अनादर ठरला असता. त्यामुळे डान्स स्टेप करण्याऐवजी या नृत्याच्या काही मुद्रा मी करून दाखवल्या होत्या.
टॉप-16 स्पर्धकांना एका राऊंडमध्ये अशा काही गोष्टी कराव्याच लागतात. वातावरण हलकं करण्यासाठी आणि थोडी धम्माल करण्यासाठी असे प्रश्न विचारले जातात. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा मजेशीर पैलू समोर येतो. हरनाजला मांजरीचा आवाज काढायला सांगितलं गेलं, कारण ‘मला प्राण्यांचा आवाज काढायला आवडतो,’ असं हरनाजने तिच्या questionnaire मध्ये लिहिलं आहे. त्यामुळे स्टेजवर स्टीव्हने तिला मांजरीचा आवाज काढायला सांगितला. हरनाजला कमी लेखण्यासारखं यात काहीही नव्हतं.