मुंबई – स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानं संपूर्ण देशवासियांना मोठा धक्का बसला आहे. मंगेशकर कुटुंबीयांसोबत लता दिदींच्या जाण्यानं आणखी एका व्यक्तींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या व्यक्तीनं आयुष्याची २७ वर्ष लता मंगेशकर यांची सेवा करण्यात घालवली. त्यांचे नाव आहे महेश राठोड. लता मंगेशकर गेल्याचं समजताच महेशच्या पायाखालची वाळू सरकली. रडून रडून महेश राठोडची अवस्था बिकट झाली. लता दिदींच्या सहवासाशिवाय आजपर्यंत महेशचा एकही क्षण गेला नाही.
महेश राठोडनं सांगितले की, लता दिदी गेल्यानं मी पूर्णपणे तुटलो आहे. या जगात मी एकटाच पडल्याची जाणीव होतेय. महेश राठोड अमरेलीच्या मोरंगी गावात राहणारा आहे. लता मंगेशकर महेश राठोडला भाऊ मानत होत्या. २००१ पासून लता मंगेशकर महेशला राखी बांधायच्या. आता दिदी परत कधीच येणार नाही या विचाराने महेशच्या डोळ्यातून पाणी येते.
१९९५ मध्ये घर सोडून मुंबईला आले
महेश राठोड १९९५ मध्ये त्यांचे घर सोडून डोळ्यात स्वप्न साठवत मुंबईला आले होते. याठिकाणी त्यांनी काम शोधण्यास सुरुवात केली. एकेदिवशी महालक्ष्मी मंदिराजवळ बसलेले असताना एका व्यक्तीने त्याला सांगितले लता मंगेशकर यांच्या घरी कामासाठी एक माणूस हवा. हे ऐकून सुरुवातीला महेश राठोडला गावाकडून आल्याने कुणी खिल्ली उडवत असेल असं वाटलं.
महेश राठोड लता मंगेशकरांच्या घरी कसंतरी पोहचले त्यानंतर हळूहळू लता मंगेशकरांचा त्यांनी विश्वास जिंकला. लता मंगेशकरांच्या देखभालीची पूर्ण जबाबदारी महेश यांच्यावर होती. महेश राठोड केवळ लता दिदींचे केअरटेकर नव्हे तर आर्थिक बाजूही सांभाळत होते. लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापासून त्यांनी औषधं वेळेवर घेतली की नाही हेदेखील महेश पाहत होते.
‘असं’ मिळालं लता मंगेशकर यांच्या घरी काम
महेश राठोड यांनी TOI वृत्तपत्राला सांगितले की, एका पोलिसाने मला राधाकृष्ण देशपांडे यांच्याकडे घेऊन गेले, जे अनेक वर्षापासून लतादिदींचे काम पाहायचे. त्यांनी माझा नंबर घेतला आणि ३ दिवसांनी फोन करुन प्रभुकुंजला बोलावलं. त्याठिकाणी छोटी मुलाखत घेऊन मला कामावर ठेवले गेले. सुरुवातीला मला वाहन चालकाची नोकरी दिली.
महेश राठोड सकाळी लतादिदींच्या घरी काम करायचे आणि रात्री अभ्यास करायचे. त्यांनी कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतले. एकवेळ होती जेव्हा महेश राठोड लता दिदींचे काम सोडून जात होता. तेव्हा राधाकृष्ण देशपांडे यांनी लता ताईंना तुझ्याशिवाय चांगला माणूस मिळणार नाही असं महेशला सांगितले. त्यानंतर महेशनं काम सोडून जाण्याचा विचार बदलला. लता मंगेशकरांच्या घरी काम करतो हा विश्वास पटण्यासाठी महेशच्या कुटुंबाला ४ वर्ष लागली. जेव्हा महेशनं त्याच्या कुटुंबीयांना लतादिदींच्या घरी आणलं. त्यांची भेट घालून दिली तेव्हा त्यांना विश्वास पटला.
महेश राठोड यांना अश्रू अनावर झाले होते. रडत रडत ते लता मंगेशकरांच्या आठवणी निकटवर्तीय निकुंज पंडित यांना सांगत होते. तेव्हा ते ऐकून निकुंजचेही डोळे पाणावले. निंकुज म्हणाला की, महेश राठोडनं हिंमत करुन स्वत:ला या दु:खाच्या क्षणी सावरलं. कारण लता दिदींच्या अंत्यदर्शनाला लाखो लोकं येणार होती. त्यांची जबाबदारी महेशवर होती. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत लता दिदींची सोबत महेशनं निभावली.